CoronaVirus : अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; मृतांचा आकडा ४१ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:35 AM2020-06-10T11:35:23+5:302020-06-10T11:40:17+5:30
बुधवार, १० मे रोजी आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने या आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या ४१ झाली आहे.
अकोला : अकोल्यात बस्तान मांडून बसलेल्या कोरोनाने आता चांगलाच धुमाकूळ घातला असून, या संसर्गजन्य आजाराने मृत्यूमुखी पडणाºयांची संख्या वाढतच आहे. बुधवार, १० मे रोजी आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने या आजाराला बळी पडणाºयांची संख्या ४१ झाली आहे. बुधवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत कोणतीही भर पडली नाही ही दिलासा देणारी बाब ठरली आहे. दरम्यान,बुधवारी १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सद्यस्थितीत २६४ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
कोरोनाचा विदर्भातील हॉटस्पॉट अशी ओळख निर्माण झालेल्या अकोल्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने संक्रमित रुग्ण समोर येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८६४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची नोंद आहे. तर आतापर्यंत ४१ जण या आजाराला बळी पडले आहेत. बुधवारी गाडगेनगर- हरीहरपेठ भागातील एका ६२ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर व्यक्तीला ६ जून रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी सकाळी एकूण २६ अहवाल प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह असल्याने अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे.
आणखी १४ जणांना डिस्चार्ज
एकीकडे कोरोनाची बाधा होणाºयांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे या संसर्गजन्य आजारावर मात करणाºयांचा आकडाही वाढत आहे. बुधवारी सकाळी १४ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यापैकी नऊ जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित पाच जणांना घरी सोडण्यात आले. त्यात नऊ महिला तर पाच पुरुष आहेत. त्यातील तिघे सिव्हिल लाईन येथील, तिघे हरिहरपेठ येथील, दोघे अकोट फैल येथील तर उर्वरित हिंगणारोड, आंबेडकर नगर, गुरुनानक नगर, गायत्री नगर, सिटी कोतवाली व माळीपूरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. आतापर्यंत ५५९ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्या २६४ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्राप्त अहवाल-२६
पॉझिटीव्ह-शून्य
निगेटीव्ह-२६
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- ८६४
मयत-४१ (४०+१),डिस्चार्ज- ५५९
दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- २६४