coronavirus : ‘कोरोना’च्या संशयिताचे केस पेपर सोशल मीडियावर व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 01:34 PM2020-03-09T13:34:12+5:302020-03-09T13:34:20+5:30
रुग्णाचे छायाचित्र व रुग्णाचे केस पेपर सोशल मीडियावर वाऱ्यासारखे फिरले.
अकोला : अकोल्यात ‘कोरोना’चा पहिला संशयित रुग्ण आढळल्याने शनिवारी सर्वत्र खळबळ उडाली. संशयितावर आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू असतानाच उपचारादरम्यानचे रुग्णाचे छायाचित्र व रुग्णाचे केस पेपर सोशल मीडियावर वाऱ्यासारखे फिरले. या प्रकरणाची चौकशी करावी, अशा मागणीची तक्रार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात केली.
सर्वोपचार रुग्णालयात ‘कोरोना’च्या संशयित रुग्णावर आयसोलेशन वॉर्डात प्राथमिक उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या निदानासाठी नमुने नागपूरला पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल येणे बाकी आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळपासून सोशल मीडियावर रुग्णाचे छायाचित्र व प्राथमिक तपासणीचा वैद्यकीय अहवाल सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. त्यामुळे संशयित रुग्णाची ओळख सार्वजनिक झाली असून, हा प्रकार कायद्याने गुन्हा आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी शनिवारी रात्रीच सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली.
कोरोनाच्या संशयित रुग्णा बाह्यरुग्ण तपासणी अहवाल सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशा मागणीची तक्रार सिटी कोतवाली पोलिसांकडे करण्यात आली आहे. रुग्णाची ओळख सार्वजनिक करणे चुकीचे आहे.
- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.