CoronaVirus : दिल्लीहून येणाऱ्या नागरिकांना व्हावे लागेल ‘इन्स्टिट्युशनल क्वारंटीन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 10:42 AM2020-04-06T10:42:57+5:302020-04-06T10:43:25+5:30
‘आयसोलेशन’ कक्षात अथवा ‘होम क्वारंटीन’चा कालावधी पूर्ण केला असला तरी त्यांना शोधून ‘इन्स्टिट्युशनल क्वारंटीन’मध्ये ठेवण्याचे निर्देश मनपाला प्राप्त झाले आहेत.
- आशिष गावंडे
अकोला: दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज प्रकरणानंतर सतर्क झालेल्या राज्य शासनाने शहरी भाग असो वा ग्रामीण भागात दिल्ली येथून दाखल झालेल्या व्यक्तींवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश पोलीस व जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेला जारी केले आहेत. संबंधित नागरिकांनी ‘आयसोलेशन’ कक्षात अथवा ‘होम क्वारंटीन’चा कालावधी पूर्ण केला असला तरी त्यांना शोधून ‘इन्स्टिट्युशनल क्वारंटीन’मध्ये ठेवण्याचे निर्देश मनपाला प्राप्त झाले आहेत. त्या पृष्ठभूमीवर मनपा प्रशासनाने क्षेत्रीय स्तरावर चार पथकांचे गठन केले आहे.
गत काही दिवसांत देशात व महाराष्ट्रात कोरोना ‘पॉझिटिव्ह’ व संदिग्ध व्यक्तींच्या संख्येत वाढ होत आहे. नागरिकांना गर्दी न करण्याचे तसेच एकमेकांच्या संपर्कात न येण्याचे वारंवार आवाहन केले जात असले तरी नागरिक या सूचनांकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र समोर आले आहे. या प्रकारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. यादरम्यान, दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज प्रकरणानंतर राज्य शासन कमालीचे सतर्क झाले आहे. राज्यातील शहरी भाग असो व ग्रामीण भागात दिल्ली येथे विविध कामकाजानिमित्त गेलेल्या व परत आलेल्या नागरिकांवर करडी नजर ठेवण्याचे पोलीस यंत्रणा, आरोग्य, जिल्हा व मनपा प्रशासनाला निर्देश प्राप्त झाले आहेत. प्रशासकीय यंत्रणांनी आपसात समन्वय राखत संबंधित नागरिकांचा शोध घेऊन त्यांना ‘इन्स्टिट्युशनल क्वारंटीन’ करण्याची सूचना प्राप्त झाल्याची माहिती आहे. त्या पृष्ठभूमीवर मनपा प्रशासनाने अशा नागरिकांचा शोध घेण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर चार विविध पथकांचे गठन केले आहे.
१२ जणांचा घेतला शोध
दिल्ली येथे विविध कामनिमित्त गेलेल्या व ‘लॉकडाऊन’नंतर शहरात दाखल झालेल्या नागरिकांची ‘हिस्ट्री’ तपासण्याचे काम मनपाच्या स्तरावर केले जात आहे. १ एप्रिलपासून मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने १२ जणांचा शोध घेतला असून, त्यांना ‘इन्स्टिट्युशनल क्वारंटीन’ होण्याचे निर्देश दिले आहेत.
...तरीही उपचार घ्यावेच लागतील!
दिल्ली येथून शहरात दाखल झालेल्या व्यक्तींनी यापूर्वी रुग्णालयात तपासणी केली असेल किंवा १४ दिवसांचा ‘होम क्वारंटीन’चा कालावधी पूर्ण केला असेल, तरीही त्यांना ‘इन्स्टिट्युशनल क्वारंटीन’अंतर्गत पुढील १४ दिवस देखरेखीखाली ठेवल्या जाणार आहे. यादरम्यान, संबंधित संदिग्ध नागरिकांनी नकार दिल्यास त्यांच्याविरोधात पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.