Coronavirus: अकोला जिल्ह्यात संचारबंदी लागू ; जिल्ह्याच्या सीमा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 09:08 PM2020-03-23T21:08:21+5:302020-03-24T10:55:49+5:30
Coronavirus: अकोला जिल्ह्यात संचारबंदी; जिल्ह्याच्या सीमा बंद
अकोला :कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपायांचा भाग म्हणून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज जारी केले. राज्य शासनाने जारी केलेल्या संचारबंदीच्या आदेशान्वये हे आदेश जारी करण्यात आले आहेत.यासंदर्भात जिल्ह्याच्या सर्व सिमा बंद करण्यात आल्या असून बाहेरील जिल्ह्याशी कोणत्याही प्रकारचे आवागमन बंद राहील. संचारबंदीत जीवनावश्यक वस्तू व सेवा उपलब्ध व्हाव्या यासाठी नियोजन करण्यात आले असून नागरिकांनी आपापल्या घरातच रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नेतृत्वात पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व अन्य विभागप्रमुखांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यातील उद्योग- कारखाने बंद
जिल्ह्यातील विविध उद्योग व कारखानेही बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. या कारखाने व उद्योगांत विविध कामगार, कर्मचारी, वाहतुकदार, आदींची एकत्र येण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. त्यातून औषधे निर्माण करणारे, वैद्यकीय सेवेचे साहित्य निर्मिती करणारे कारखाने, सॅनिटायझर, साबण, जंतूनाशक,हॅण्डवॉश तयार करणाऱ्या कंपन्या, कारखाने,कृषि उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग दालमिल, ऑईल कंपन्या इ. अत्यावश्यक वस्तू सेवा पुरविणारे उद्योग यांना वगळण्यात आले आहे.
जिल्ह्याच्या सिमा बंद
अकोला जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आल्या असून कोणत्याही मार्गाने जिल्ह्यात बाहेरुन वा शेजारील जिल्ह्यातील व्यक्तीस येण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या सर्व मार्गांवर पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत. हे आदेश आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २, ३ व ४ अन्वये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले असून हे आदेश पोलीस व आरोग्य तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कर्तव्यावर असलेल्या व्यक्ती किंवा वाहनांना वगळण्यात आले आहे. तसेच रुग्ण वाहतूक कर्तव्यावरील हॉस्पिटल मधील डॉक्टर व पॅरामेडीकल स्टाफ, वीज, पाणी पुरवठा, दूरसंचार, औषधी वाहने, अग्निशमन वाहने, बॅंकांची व एटीएम मध्ये पैसे भरणारी वाहने व कर्तव्यावरील कर्मचारी, जीवनावश्यक वस्तू सेवा, माल यांची वाहतूक करणारे कर्तव्यावरील कर्मचारी अधिकारी, कर्तव्यावरील प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तसेच जिल्हादंडाधिकारी यांनी परवानगी दिलेली वाहने व अधिकारी कर्मचारी यांची वाहने यांना यातून वगळ्यात आले आहे.