CoronaVirus : सर्वोपचार रुग्णालयातील दोन डॉक्टरांना कोरोनाची बाधा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 10:09 AM2020-06-16T10:09:21+5:302020-06-16T10:09:40+5:30
दोन डॉक्टरांनाही कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती सोमवारी वैद्यकीय अहवालातून समोर आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, रुग्णसंख्या हजार पार गेली असून, कोरोना योद्धा म्हणून सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी रात्रंदिवस लढत आहेत; परंतु अशातच यातील दोन डॉक्टरांनाही कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती सोमवारी वैद्यकीय अहवालातून समोर आली. सलग दोन महिन्यांपासून येथे कार्यरत डॉक्टरांची एकच चमू कोरोना विरुद्धचा लढा देत असून, आता या चमूला पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यांच्यावर उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय हा एकमेव पर्याय आहे. तर येथे कार्यरत डॉक्टरांची एकच चमू गत दोन महिन्यांपासून कोरोना विरुद्ध लढा लढत आहे. अशातच सर्वोपचार रुग्णालयातील दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी १३ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांना हायड्रोक्सी क्लोरोक्वीन हे औषध दिले जात असले तरी अनेक दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांमध्ये वास्तव्यास असल्याने या डॉक्टरांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे वृत्त १४ मे रोजी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. डॉक्टरांची ही चमू दोन महिन्यांपासून कोविड वार्डात रुग्णसेवा देत असून, आता त्यांच्यातील डॉक्टर पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. त्यामुळे आतातरी प्रशासन त्यांच्यासाठी पर्यायी डॉक्टरांचा बंदोबस्त करेल का? असा सवाल येथे कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वैद्यकीय कर्मचाºयांमधून उपस्थित केला जात आहे.
इतर वैद्यकीय कर्मचाºयांचाही जीव धोक्यात
डॉक्टरांसोबतच सर्वोपचार रुग्णालयातील इतर वैद्यकीय कर्मचारीदेखील रात्रंदिवस जीव धोक्यात घालून कोरोना बाधित रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांच्याही पर्यायी व्यवस्थेची व्यवस्था करण्यात आली नाही. म्हणूनच गत दोन महिन्यांपासून एकच चमू कोरोना वार्डात निरंतर रुग्णसेवा देत आहे.
‘जीएमसी’ला आठवडाभरापूर्वी दिले १५ डॉक्टर
सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवेचा वाढता ताण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील १५ डॉक्टर व परिचारिका उपलब्ध करून दिले आहेत; परंतु वाढत्या रुग्णसंख्येमुळे ही व्यवस्थादेखील अपुरी पडत आहे.
१३ पैकी आठ कर्मचाºयांना सुट्टी
आतापर्यंत सर्वोपचार रुग्णालयातील १३ वैद्यकीय कर्मचारी पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यातील ८ जणांना सुट्टी, तर पाच जणांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.