CoronaVirus : अकोल्यात कोरोनाचा उद्रेक ...हे अपयश कोणाचे?
By राजेश शेगोकार | Published: May 28, 2020 12:07 PM2020-05-28T12:07:48+5:302020-05-28T12:15:12+5:30
केवळ चिंतन नव्हे, तर थेट मूल्यमापन करून ज्याचे माप त्याच्या पदरात टाकण्याची वेळ आली आहे.
- राजेश शेगोकार
अकोला: विदर्भात कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ म्हणून आता अकोल्याचे नाव प्रामुख्यानेच घ्यावे लागेल, एवढी रुग्णसंख्या अकोल्यात आहे. ७ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळल्यानंतर रुग्णवाढीचा वेग हा अतिशय मंद होता. तब्बल वीस दिवस रुग्णसंख्या ही १७ च्या पुढे गेली नाहीच. शिवाय, रुग्ण ‘कोरोना’मुक्त होण्याचे प्रमाण चांगले होते. एका आत्महत्येसह केवळ एक मृत्यू अशी नोंद अकोल्याच्या नावावर होती; मात्र २८ एप्रिल रोजी पाच रुग्ण आढळले अन् रुग्णवाढीचा सुरू झालेला वेग केवळ महिनाभरात विदर्भात सर्वाधिक ठरला आहे. २७ एप्रिलचे १७ रुग्ण प्रत्यक्षात सातच अॅक्टिव्ह रुग्ण अशी स्थिती असलेला अकोला हा २८ मे रोजी ५०८ रुग्णसंख्येचा ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. हे अपयश कोणाचे, याचे केवळ चिंतन नव्हे, तर थेट मूल्यमापन करून ज्याचे माप त्याच्या पदरात टाकण्याची वेळ आली आहे.
२२ मार्चच्या ‘जनता कर्फ्यू’नंतर सुरू झालेल्या ‘लॉकडाउन’च्या कालावधीत सुरुवातीचे दोन-तीन दिवस वगळले, तर कुठेही ‘लॉकडाउन’ची प्रक्रिया कठोरपणे राबविली जात असल्याचे दिसले नाही. जत्रेसारखे भरणारे भाजी बाजार, खोट्या कारणांची भंडोळे मिरवित रस्त्यावर फिरणारे महाभाग यांच्या जोडीला रातोरात निर्माण झालेल्या घरपोच वस्तूंचे ठेकेदार यांची गर्दी शहराच्या कुठल्याही भागात दिसत होती. कुठेही अटकाव केला जात नाही, कारवाई होत नाही, हे पाहून मग जनतेलाही लॉकडाउनचे गांभीर्य राहिले नाही. वेळ, संधी मिळेल तेव्हा लॉकडाउनचा भंग करण्यातही बहुसंख्य अकोलेकर पुढे होते, हे नाकारता येणार नाही.
एकीकडे बहुसंख्य जनता अशी बेफिकीर असतानाच प्रशासनही आपल्याच तालात राहिले ते अजूनही असल्याचे अनेकदा समोर आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, सर्वोपचार रुग्णालय, पोलीस, महापालिका, जिल्हा परिषद या यंत्रणांमध्ये कुठेही समन्वय दिसला नाही. प्रतिबंधित क्षेत्राची व्याप्ती, बंदोबस्त, तेथील मोकाटपणा याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या कानीकपाळी ओरडून सांगितल्यावरही दखल घेतल्या गेली नाही. अलगीकरण कक्षातील सुविधा, कोरोनाबाधितांवरील उपचारात हलगर्जी, मृतकांच्या अहलवालांना लागणारा विलंब, इतकेच नाही तर कोरोनाबाधित रुग्ण दाखल करून घेण्यासही टाळाटाळ झाल्याचे समोर आल्यावरही कुणावरही कारवाईचा बडगा उचलला गेला नाही. मूर्तिजापुरात संदिग्ध रुग्णाचा मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्याचा प्रकारही असाच कठोर कारवाईविना संपविला. कोरोनाबाधितांच्या भोजन व्यवस्थेपासून तर त्यांच्या कक्षातील स्वच्छता, डॉक्टरांची तपासणी अशा अनेक मुद्यांवर व्यवस्थेचे वाभाडे काढणारे व्हिडिओ व आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्या; मात्र त्यांची गंभीरपणे दखल न घेतल्यानेच सर्वोपचारचा आधार वाटण्याऐवजी रुग्णांना भीतीच वाटू लागली आहे.
एकीकडे कोरोना रुग्णांची वाढती संख्या व त्यांच्या उपचारांची बोंब असतानाच दुसरीकडे नॉन कोविड रुग्णांचीही परवड वाढत आहे. शहरातील अनेक दवाखान्यांनी प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्ण दाखलच करून घ्यायचा नाही, असे परस्पर ठरविले आहे. त्याची दखल कोण घेणार, कोरोनाबाधितांचा वाढता धोका लक्षात घेता खासगी दवाखान्यांच्या अधिग्रहणांबाबत कुठलेही धोरण ठरले नाही. अशा कितीतरी गोष्टी अनेकदा समोर आल्या आहेत; पण गांभीर्याने घेतो कोण, शहरात रुग्णांचे ‘ट्रेसिंग’ चांगले झाले, यात वादच नाही. जर ‘टेस्टिंग’ वाढल्या नसत्या, तर कदाचित याहीपेक्षा मोठा धोका समोर आला असता. त्यामुळे वाढलेल्या ‘टेस्टिंग’ हीच काय ती जमेची बाजू; मात्र ‘ट्रेसिंग’, ‘टेस्टिंग’नंतर ‘ट्रीटमेंट’ महत्त्वाची आहे. या ‘ट्रीटमेंट’च्या मुद्यावर मात्र आपल्याला युद्धपातळीवर बदल करावे लागणार आहेत. ‘ट्रीटमेंट’ केवळ वैद्यकीयच नाही, तर सुविधांचीही द्यावी लागणार आहे. त्यामुळेच ‘कोरोना’मुक्त होण्याचे प्रमाण वाढू शकेल. सध्या निर्माण झालेली स्थिती हे अपयश कोणाचे, याचे मूल्यमापन होईलच; मात्र आता सर्वात आधी हे शहर आपले आहे, आपल्यालाच सांभाळावे लागणार आहे, याची जाणीव प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. त्यामुळे जनतेनेही स्वयंशिस्त पाळून आता शासनाच्या निर्देशाचे पालन करणे अपेक्षित आहे, अन्यथा ‘चौघांची माय अन् खाटल्यावर जीव जाय’, या म्हणीप्रमाणे लोकप्रतिनिधींची मोठी लिस्ट अन् नामांकित वैद्यकीय संस्था असूनही आपल्या हाती केवळ रुग्णवाढीचे आकडे मोजणे एवढेच काम उरेल!