Coronavirus : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच; आणखी एकाचा मृत्यू, १६ नवे पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण ३२४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 11:49 AM2020-05-21T11:49:42+5:302020-05-21T12:30:56+5:30
२१ मे रोजी एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली, तर आणखी १६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
अकोला : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असले, तरी दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येवरून त्याचे अपयश अधोरेखित होत आहे. गुरुवार, २१ मे रोजी एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली, तर आणखी १६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३२४ वर गेला आहे. तर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही २१ झाली आहे. दरम्यान, बुधवारी रात्री २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
विदर्भात नागपूरनंतर अकोला शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. शहर व जिल्हा मिळून बुधवार २० मे रोजी ३०० चा टप्पा ओलांडत बाधितांची संख्या ३०८ झाली. यामध्ये गुरुवारी आणखी १६ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त १०४ अहवालांपैकी १६ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरित ८८ अहवाल निगेटिव्ह आहेत. गुरुवारी सकाळी प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल नऊ पुरुष व सात महिलांचे आहेत. यामध्ये रेल्वे कॉलनी जठारपेठ येथील तीन जण, फिरदौस कॉलनी येथील दोन, डाबकी रोड येथील दोन, नायगाव येथील दोन, तर रजपूतपुरा, ज्योतीनगर सिव्हिल लाईन्स, न्यू राधाकिसन प्लॉट, गोरक्षण रोड, सोनटक्के प्लॉट, पुरपिडीत कॉलनी अकोट फैल, लक्ष्मीनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दरम्यान, भीमचौक अकोट फैल येथील रहिवासी असलेला ६८ वर्षीय रुग्णाचा बुधवारी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या रुग्णाला १८ मे रोजी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सद्यस्थितीत ११२ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
२४ जणांना डिस्चार्ज
एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे बरे होणाऱ्यांचा आकडाही दिलासा देणारा ठरत आहे. बुधवार, २० मे रोजी रात्री २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील २१ जण कोवीड केअर सेंटरला निरीक्षणात आहेत. तर तिघांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये अकोली गितानगर-चार, आंबेडकरनगर- चार, भिमचौक अकोट फैल-तीन, अकोट फैल भवानी पेठ-दोन, तर फिरदौस कॉलनी, डाबकी रोड, अकोट फैल, खोलेश्वर, रंगारहट्टी बाळापूर, सुभाष चौक, नेहरु नगर, खदान, सिव्हिल लाईन, खैर मोहम्मद प्लॉट, रामदास पेठ पोलीस क्वार्टर येथिल प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- ३२४
मयत-२१(२०+१),डिस्चार्ज- १९१
दाखल रुग्ण(अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- ११२