CoronaVirus : वाशिमच्या कोरोनाबाधिताचा वर्धेत मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 04:34 PM2020-05-29T16:34:15+5:302020-05-29T17:30:31+5:30
कवठळ (ता.मंगरूळपीर) येथील एका ६३ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा शुक्रवार २९ मे रोजी सकाळी २ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सेवाग्राम (जि.वर्धा) येथील कस्तूरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कवठळ (ता.मंगरूळपीर) येथील एका ६३ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा शुक्रवार २९ मे रोजी सकाळी २ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.
मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील एका रूग्णाला हृदय रोगाच्या उपचारासाठी सावंगी (जि. वर्धा) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात ८ मे रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना मधूमेह, उच्च रक्तदाब आणि अर्धांगवायूच्या आजाराचाही त्रास होता. या ठिकाणी त्यांच्या थ्रोट स्वॅबच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल १० मे रोजी प्राप्त झाला. त्यात त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गत आठ दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे त्यांना जीवनदायी प्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले; परंतु त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर २९ मे रोजी पहाटे २ वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर वर्धा येथील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे प्रशासन व आरोग्य विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, वर्धा येथील रुग्णालयात मृत्यू झालेल्या कवठळ येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या ‘लो-रिस्क’ संपर्कात एकूण ३२ जण आलेहोते. या सर्वांची प्राथमिक स्तरावर आरोग्य तपासणी करण्यात आली आणि आरोग्य विभागाच्या १२ चमूने गावात ठाण मांडून घरोघरी सर्वेक्षण केले. यात कवठळ येथील जवळपास १४०० नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यापैकी कोणालाही कोणतीही लक्षणे नसून, सर्वांची प्रकृती ठणठणीत होती. तथापि, खबरदारीचा उपाय म्हणून अजून ११ दिवस कवठळ येथे आरोग्य विभागाचा विशेष वॉच कायम असून, आता कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.
गाव केले होते सील
कवठळ येथील कोरोनाबाधित ज्या रुग्णाचा ेसेवाग्राम येथील रुग्णालयात मृत्यू झाला. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची तपासणी करून संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने ११ मे रोजीच कवठळ गाव सील केले होते. त्याशिवाय सावधगिरीचा उपाय म्हणून बाहेरगावावरून येणाºयांना प्रवेशबंदीही करण्यात आली होती.