CoronaVirus : प्रतिबंधित क्षेत्रातील वयोवृद्ध नागरिकांवर विशेष लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 05:41 PM2020-05-04T17:41:57+5:302020-05-04T17:42:19+5:30
प्रतिबंधित क्षेत्रातील वयोवृद्ध नागरिकांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी झोन अधिकाºयांना दिले आहेत.
अकोला : महापालिका क्षेत्रात कोरोनाचे संकट अधिक गडद झाले आहे. आज रोजी शहराच्या प्रत्येक भागात कोरोनाचा रुग्ण आढळून येत असल्याचे पाहून महापालिका प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्रातील वयोवृद्ध नागरिक व लहान मुलांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील वयोवृद्ध नागरिकांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी झोन अधिकाºयांना दिले आहेत.
संसर्गजन्य कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात होणार नाही, यासाठी मनपा प्रशासनाच्या स्तरावर दक्षता घेतली जात असली तरी नागरिकांच्या मनमानी समोर प्रशासन हतबल ठरत असल्याचे चित्र आहे. यादरम्यान कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांना मधुमेह व इतर आजार असल्याचे दिसून आले आहे. तसेच कोरोनाची लागण झाल्यानंतर संबंधित व्यक्तींचा मृत्यू झाल्याची बाब अहवालात समोर आली आहे. एकूणच परिस्थिती लक्षात घेता वयोवृद्ध नागरिकांना कोरोनाची लवकर लागण होत असल्याचे दिसून येत आहे. या पृष्ठभूमीवर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी प्रतिबंधित क्षेत्रातील वयोवृद्ध नागरिक व लहान मुलांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश जारी केले आहेत.