CoronaVirus : संदिग्ध रुग्णांची समजूत काढताना मनपाची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 10:38 AM2020-06-03T10:38:54+5:302020-06-03T10:39:30+5:30
कोविड सेंटरमधील अपुºया सोयी-सुविधा लक्षात घेता उपचारासाठी दाखल होण्यास संबंधितांकडून टाळाटाळ केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरात कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या रुग्णांच्या निकटवर्तीय तसेच संपर्कातील संशयित रुग्णांना उपचारासाठी कृषी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरमध्ये घेऊन जाण्यासाठी मनपाच्या यंत्रणेची चांगलीच दमछाक होत आहे. कोविड सेंटरमधील अपुºया सोयी-सुविधा लक्षात घेता उपचारासाठी दाखल होण्यास संबंधितांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यांची समजूत काढताना मनपाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे कसब पणाला लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने कृषी विद्यापीठात कोविड केअर सेंटरचे गठन केले. या ठिकाणी संशयित रुग्णांना किमान आठ ते दहा दिवस मुक्कामी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे; परंतु यानंतर कोविड सेंटरमधील मूलभूत सोयी-सुविधा तसेच जेवणाची व्यवस्था दर्जेदार नसल्याचा आरोप रुग्णांकडून होत आहे. याचा परिणाम संशयित रुग्णांवर होत असल्याचे दिसून येत आहे.
संशयित रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाताना त्यांची समजूत काढणे मनपा कर्मचाºयांसाठी जिकिरीचे काम झाले आहे.
संशयित रुग्णांचे समुपदेशन करण्यात वेळ खर्ची
उत्तर झोनमधील अकोट फैल, तारफैल, नायगाव, बैदपुरा, मोमिनपुरा, माळीपुरा, गवळीपुरा, फिरदौस कॉलनी, लकडगंज तसेच पूर्व झोनमधील आंबेडकर नगर, कृषी नगर, पश्चिम झोनमधील खैर मोहम्मद प्लॉट, शिवसेना वसाहत, सोनटक्के प्लॉट, चांदखा प्लॉट आदी भागातील रुग्णांची समजूत काढताना मनपा कर्मचाºयांकडून त्यांचे समुपदेशन केले जात आहे. रुग्णांच्या मनात निर्माण झालेल्या असंख्य प्रश्नांचे निराकरण करावे लागत असल्याची माहिती आहे.
कोविड सेंटरमधील गर्दी वाढली!
कृषी विद्यापीठातील कोविड सेंटरमध्ये ६५० खाटांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली होती. आजरोजी येथील सेंटरमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याची माहिती आहे. त्यावर जिल्हा व मनपा प्रशासनाने शहरातील शासकीय वसतिगृह ताब्यात घेतले असून, त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.