CoronaVirus : मनपाच्या भरतीया रुग्णालयात तपासणीसाठी नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 09:54 AM2020-05-06T09:54:23+5:302020-05-06T09:54:51+5:30

- आशिष गावंडे  लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : शहरातील प्रभाग क्रमांक ११ अंतर्गत येणारा बैदपुरा परिसर कोरोना विषाणूचा ‘हॉटस्पॉट’ ...

CoronaVirus: Crowd of citizens for check-up at Corporation's recruitment hospital | CoronaVirus : मनपाच्या भरतीया रुग्णालयात तपासणीसाठी नागरिकांची गर्दी

CoronaVirus : मनपाच्या भरतीया रुग्णालयात तपासणीसाठी नागरिकांची गर्दी

Next

- आशिष गावंडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरातील प्रभाग क्रमांक ११ अंतर्गत येणारा बैदपुरा परिसर कोरोना विषाणूचा ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात ताटकळत बसावे लागत असल्याची सबब पुढे करीत या भागातील नागरिकांनी आरोग्य तपासणीकडे पाठ फिरविल्याची बाब लक्षात घेता महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी मनपाच्या किसनीबाई भरतीया रुग्णालयात संशयितांचे नमुने घेण्याची व्यवस्था केली. मंगळवारी सकाळी ११.३० वाजतापर्यंत या ठिकाणी केवळ सहा जण दाखल झाले होते. दुपारी ३ वाजतापर्यंत तब्बल ७० जणांनी त्यांचे नमुने वैद्यकीय यंत्रणेला दिले. त्यानंतर यामध्ये चांगलीच वाढ झाली.
महापालिका क्षेत्रात बैदपुरा, ताजनापेठ, मोहम्मद अली रोड, मोमीनपुरा, फतेह अली चौक आदी परिसरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.
या परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांचे कुटुंबीय व त्यांचे निकटवर्तीय यांना आरोग्य तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविल्या जात आहे.
यावेळी रुग्णालयात नमुने देण्यासाठी अनेक तास ताटकळत बसावे लागत असल्याची सबब पुढे करीत संबंधित संशयित रुग्णांनी व त्यांच्या निकटवर्तीयांनी जिल्हा सामान्य रुग्णालयकडे पाठ फिरविल्याची बाब मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आली. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचे नमुने घेण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी टिळक रोडवरील मनपाच्या किसनीबाई भरतीया रुग्णालयात व्यवस्था उपलब्ध केली. मंगळवारी संशयित रुग्णांचे नमुने घेण्यासाठी प्रारंभ करण्यात आला.

नमुने देणारे ‘होम क्वारंटीन’
मनपाच्या किसनीबाई भरतीया रुग्णालयात प्रतिबंधित क्षेत्रातील संशयित नागरिकांचे नमुने घेऊन ते पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. अहवाल येईपर्यंत संशयित नागरिकांना ‘होम क्वारंटीन’ होण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. ज्या नागरिकांच्या घरी अपुरी जागा आहे, त्यांना रामदासपेठ पोलीस स्टेशनलगतच्या आबासाहेब खेडकर सभागृहात पाठविण्यात आले आहे.

‘जीएमसी’च्या या चमूने घेतले नमुने
कोरोना विषाणूची लागण झाली आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी संशयितांचे नमुने घेण्यासाठी भरतीया रुग्णालयात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने डॉ. फराह जीकारे, डॉ. गणेश पारणे, डॉ. पूजा कोहर, डॉ. विद्या डोले ही चमू दाखल झाली होती. त्यांच्या मदतीसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेतील डॉ. भास्कर सगणे, डॉ. अशोक पातोर्ढे, डॉ. सुरेश ढोरे, डॉ. प्रियेश शर्मा, डॉ. रचना सावळे, डॉ. प्रज्ञा खंडेराव, डॉ. नंदकिशोर हागे, डॉ. आसिफ इक्बाल, अनिस अहमद ही चमू कार्यरत आहे.

सुमारे अडीच तास कोणीही फिरकले नाही!
प्रतिबंधित क्षेत्रात असणाऱ्या किसनीबाई भरतीया रुग्णालयात मनपाची वैद्यकीय यंत्रणा सकाळी ९ वाजतापासून सज्ज होती. सुमारे अडीच तासपर्यंत या ठिकाणी नमुने देण्यासाठी कोणीही नागरिक फिरकले नाहीत. ११.३० वाजतापर्यंत सहा नागरिक या ठिकाणी दाखल झाल्याचे पाहावयास मिळाले.

आयुक्त म्हणाले, घाबरू नका, मीसुद्धा इथेच थांबतो!
भरतीया रुग्णालयात नमुने देण्यासाठी दाखल होणाºया नागरिकांच्या चेहºयावर चिंता दिसून येत होती. हे पाहून मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी घाबरू नका, मीसुद्धा इथेच थांबतो, असे सांगत संबंधितांना दिलासा दिला. यावेळी उपायुक्त रंजना गगे, वैभव आवारे, सहायक आयुक्त पूनम कळंबे, कार्यकारी अभियंता अजय गुजर, कर अधीक्षक विजय पारतवार, उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते उपस्थित होते.

मनपाकडून मूलभूत सुविधांची पूर्तता
भरतीया रुग्णालयात नमुने देण्यासाठी उपस्थित झालेल्या नागरिकांकरिता मनपाने बसण्यासाठी खुर्च्या व पिण्यासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे दिसून आले. तपासणीला जाण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर जंतुनाशक फवारणी केली जात होती.

 

Web Title: CoronaVirus: Crowd of citizens for check-up at Corporation's recruitment hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.