CoronaVirus : आठ दिवस: ४ हजारांवर चाचण्या; २९८ ‘पॉझिटिव्ह’, ७ मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 10:21 AM2020-07-26T10:21:25+5:302020-07-26T10:21:38+5:30
रॅपिड टेस्ट आणि आरटीपीसीआर प्रणालीद्वारे ४ हजार २३८ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याने चाचण्यांचा वेगही वाढला आहे. गत आठ दिवसांमध्ये जिल्ह्यात रॅपिड टेस्ट आणि आरटीपीसीआर प्रणालीद्वारे ४ हजार २३८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील २९८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
अकोला शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना, आता ग्रामीण भागात कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे अकोला शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ‘आरटीपीसीआर’ प्रणालीद्वारे संदिग्ध रुग्णांच्या चाचण्या करण्यात येत होत्या. कोरोना विरुद्धचा लढा आणखी सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागाने चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागात ‘रॅपिड अॅन्टीजन टेस्ट’ची मदत घेतली जात आहे. त्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत गत आठ दिवसांमध्ये तब्बल दोन हजार ८३८ चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ‘रॅपिड टेस्ट’मुळे गत आठ दिवसात जिल्ह्यातील चाचण्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण समोर आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी या मोहिमेची मोठी मदत होणार आहे.
आरटीपीसीआरद्वारे २,८३८ चाचण्या!
आतापर्यंत केवळ ‘आरटीपीसीआर’ प्रणालीद्वारे चाचण्या घेण्यात येत होत्या. या प्रणालीनुसार आठ दिवसांत केवळ १,४०५ चाचण्या करण्यात आल्या; मात्र चाचण्यांचा वेग वाढविण्यासाठी ‘रॅपिड अॅन्टीजन टेस्ट’ची मदत घेण्यात आल्याने गत आठ दिवसात २,८२८ चाचण्या अतिरिक्त झाल्या आहेत.
आठ दिवसातला मृत्यूदर २.१!
गत आठ दिवसात जिल्ह्यात कोरोनाचे सात बळी गेले, तर २९८ जण पॉझिटिव्ह आले. त्यानुसार गत आठ दिवसात जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर हा २.१ वर आहे; मात्र एकूण मृत्यूचा विचार केल्यास जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर हा ४.५७ आहे.