Coronavirus : अकोल्यात एकाच दिवशी चार मृत्यूंची नोंद; मृतकांचा आकडा ११ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 07:36 PM2020-05-06T19:36:52+5:302020-05-06T20:27:38+5:30
कोविड-१९ आजाराने गत २४ तासात शहरातील विविध भागातील चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी सायंकाळी सांगण्यात आले.
अकोला : अकोल्यात चांगलेच बस्तान मांडलेल्या कोरोना विषाणूने आता विक्राळ रुप धारण केले असून, बाधित रुग्णांसोबत मृत्यूमुखी पडणाऱ्यांचाही आकडा वाढतच आहे. कोविड-१९ आजाराने गत २४ तासात शहरातील विविध भागातील चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी सायंकाळी सांगण्यात आले. आज नोंदविल्या गेलेल्या मृतकांमध्ये दोन महिला या बैदपुरा भागातील, एक व्यक्ती दाना बाजार भागातील, तर एक जण खंगनपुरा भागातील आहे. यापैकी तीघांचा मृत्यू मंगळवारी झाला असून, त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आज स्पष्ट झाले. तर खंगनपुरा भागातील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू बुधवारी सकाळी ८ वाजताचे दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु असताना झाल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, बुधवारी एकून १०० अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर ९३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले आहे. आज सकाळी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये एक महिला रुग्ण राधाकिसन प्लॉट, तर एक ताजनगर मधील आहे. तर सायंकाळच्या अहवालात पॉझिटिव्ह आलेले दोन रुग्ण ज्यात एक सहा वर्षिय बालिका व २० वर्षीय युवतीचा समावेश आहे. या दोघी अनुक्रमे मेहर नगर व ताजनगर भागातील आहेत.
दरम्यान, कोविड आजाराने आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून, एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे.
तीन वर्षीय बालक कोरोनामुक्त
दरम्यान, बुधवारी सायंकाळी एका तीन वर्षीय बालक्ष कोरोनामुक्त झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सदर बालकाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.