CoronaVirus : दीड वर्षीय बालकासह आणखी चार पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १६३ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 10:58 AM2020-05-12T10:58:24+5:302020-05-12T11:00:15+5:30
चारही रुग्ण हे तारफैल भागातील भवानीपेठ परिसरातील असल्याची माहीती आहे.
अकोला : शहरातील कोरोना संसर्गाची बाधा होणाऱ्यांची संख्या वाढतच असून, मंगळवार, १२ मे रोजी यामध्ये आणखी चौघांची भर पडली आहे. मंगळवारी सकाळी प्राप्त अहवालांनूसार दीड वर्षीय बालकासह चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. चारही रुग्ण हे तारफैल भागातील भवानीपेठ परिसरातील असल्याची माहीती आहे. यामध्ये दीड वर्षाचा बालक, आठ वर्षाचा मुलगा, २३ वर्षीय महिला व ६२ वर्षाचा पुरुष यांचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. चार नवे पॉझिटिव्ह आढळल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १६३ वर पोहचली आहे.
पश्चिम वºहाडात अकोला शहर हे कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरले आहे. पहिला रुग्ण सात एप्रिल रोजी आढळलेल्या अकोल्यात महिनाभरात दीडशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचाही आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत; परंतु रुग्णांची संख्या मात्र कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. अकोला शहराती बैदपूरा हा कोरोनाचा केंद्रबिंदू ठरत असला, तरी आता इतरही भागात झपाट्याने संसर्ग होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. बुधवार, १२ मे रोजी एकून ५० संदिग्ध रुग्णांचे अहवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेकडून प्राप्त झाले. यामध्ये चौघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित ४६ जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकून कोरोनाबाधितांचा आकडा १६३ झाला आहे. आतापर्यंत १४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. १३ जणांचे कोविड-१९ आजाराने नैसर्गिक मृत्यू, तर एका कोरोनाबाधिताची आत्महत्या, अशा १४ मृत्यूंची नोंद प्रशासनाकडे आहे. आज रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात एकूण १३५ रुग्ण दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
आज प्राप्त अहवाल- ५०
पॉझिटीव्ह-चार
निगेटीव्ह-४६
अशी आहे सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - १६३
मयत-१४(१३+१),डिस्चार्ज - १४
दाखल रुग्ण(अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १३५