CoronaVirus : कोरोनाबळींची वाढती संख्या चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 05:23 PM2020-05-12T17:23:42+5:302020-05-12T17:23:48+5:30
रविवारी दूपार पर्यंत अकोल्यातील रूग्णांची संख्या १६३ असून १३ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
- राजेश शेगोकार
अकोला : विदर्भात नागपूरनंतर अकोला हे कोरोनाचा नवा 'हॉट स्पॉट' बनले आहे. नागपूर खालोखाल सर्वाधीक रूग्ण अकोल्यात असून त्यामध्ये गेल्या १ मे पासून सातत्याने वाढत होत आहेच मात्र मृत्यूचेही प्रमाण वाढतेच आहे. रविवारी दूपार पर्यंत अकोल्यातील रूग्णांची संख्या १६३ असून १३ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
अकोल्यात ७ एप्रिल रोजी पहिला रूग्ण आढळला होता त्यांनतर रूग्ण वाढीचा वेग २६ एप्रिल पर्यंत अतिशय संथ होता मात्र २८ एप्रिल पासून रूग्णांची संख्या वाढतीच राहिली असून ती आता १६३ च्या घरात पोहचली आहे. यामध्ये एका रूग्णांने आत्महत्या केली असून १३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. केवळ १४ रूग्णच कोरोनामुक्त झाले आहेत. अकोल्यातील कोरोनाबाधीतांच्या आकडयांशी विदर्भातील इतर जिल्ह्यांशी तुलना केली असता अमरावतीचा मृत्यूदर हा सर्वात जास्त दिसतो तिथे १२ मृत्यू असून रूग्णांची संख्या केवळ ७९ आहे. मात्र अकोल्याची वाढती रूग्णसंख्या चिंताजनक असून मृत्यूची संख्याही १३ आहे. अकोल्याच्या तुलनेत नागपूरात सर्वाधीक रूग्णसंख्या आहे. नागपूरात २९८ रूग्ण असून केवळ तिघांचा मृत्यू असून कोरोनामुक्त रूग्णांची संख्याही तब्बल १०१ आहे.
अकोल्यातील बैदपुरा, मोहम्मद अली रोड, पिंजारी गल्ली, खंगारपूरा, सिंधी कँप, भिमनगर, न्यू भिमनगर हे सर्वाधिक कोरोनाबाधित परिसर आहे. या भागातील अरूंद गल्ल्या, अगदी लागून असलेली घरे यामुळेही संक्रमणाचा धोका वाढला आहे.
अकोल्यात मरण पावलेल्या १३ रूग्णांपैकी तब्बल आठ रूग्ण अगदी शेवटच्या क्षणी रूग्णालयात दाखल झाले होते. तोपर्यंत त्यांनी आपला आजार प्रशासन आणि लोकांपासून लपवून ठेवला होताय. याच काळात त्यांचा अनेकांशी संपर्कही आलाय. अगदी शेवटच्या क्षणी रूग्णालयात दाखल झालेले हे रूग्ण वाचू शकले नाहीच सोबतच त्यांच्या संपर्कात आलेलेही अनेकजण बाधित झाले आहेत.