CoronaVirus : एसटीत ‘सुरक्षित अंतर ठेवा योजना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 02:26 PM2020-03-20T14:26:31+5:302020-03-20T14:26:55+5:30
एसटीच्या एका सीटवर एकच प्रवासी बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या बैठक व्यवस्थेत बदल केला असून, आता एसटीच्या एका सीटवर एकच प्रवासी बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘सुरक्षित अंतर ठेवा योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रवाशांच्या बैठक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवून प्रवास करण्याच्या दृष्टीने काही आसने बैठक व्यवस्थेसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही बसमधून उभे राहून प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय एसटी महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडून राज्यातील सर्वच विभाग नियंत्रक कार्यालयात धडकला आहे. या निर्णयानुसार संपूर्ण बसमध्ये बसच्या क्षमतेच्या केवळ ५० टक्केच प्रवासी बसवून ती मार्गावर सोडण्यात येणार आहे. आवश्यकता वाटल्यास जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. एसटी बसमध्ये समाजातील विविध घटकांसाठी राखीव आसनांवरील आरक्षण या स्थितीत रद्द करण्यात आले आहे. या निर्णयामुळे यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात बऱ्यापैकी यश मिळेल, असा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे.
मध्यवर्ती कार्यालयाकडून हा निर्णय आम्हाला मिळाला असून, त्याची अंमलबजावणी गुरुवारपासूनच सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांनीही सोबत बसण्याचा आग्रह न धरता या नियमामागील सुरक्षेची दक्षता लक्षात घेऊन सहकार्य करावे.- चेतना खिरोडकर, विभाग नियंत्रक, अकोला आगार