CoronaVirus : विदेशातून आलेल्या आणखी एका महिलेची वैद्यकीय चाचणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 11:27 AM2020-03-16T11:27:10+5:302020-03-16T11:27:32+5:30
महिलेची वैद्यकीय तपासणी करून नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
अकोला : विदेशातून आलेल्या आणखी एका महिलेची रविवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. महिलेची वैद्यकीय तपासणी करून नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
अकोल्यातील एक महिला शनिवारी रात्री उशिरा अकोल्यात पोहोचली. आरोग्य विभागाच्या सूचनेनंतर ती महिला रविवारी सकाळी सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाली. यावेळी महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शिवाय, नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आल्याची माहिती आहे. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या महिलेची प्रकृती चांगली आहे; मात्र सतर्कता म्हणून महिलेला १४ दिवसांसाठी ‘होम क्वारंटीन’च्या सूचना दिल्या आहेत. या काळात घरातच राहण्याचे निर्देशही महिलेला आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात आले.
विदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या १६ वर
गत पंधरा दिवसांत विदेशातून अकोल्यात आलेल्या नागरिकांची संख्या १६ वर पोहोचली आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील एका संशयित रुग्णाचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आणखी चार लोक अकोल्यात येणार असून, आरोग्य यंत्रणा त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.
विदेशातून आलेल्या एका महिलेची रविवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्या महिलेची प्रकृती चांगली असून, तिला ‘होम क्वारंटीन’च्या सूचना दिल्या आहेत.
- डॉ. फारुख शेख, वैद्यकीय अधिकारी, महापालिका, अकोला.