CoronaVirus : राज्यात अकोल्यातील मृत्यूदर स्थिर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 02:40 PM2020-11-21T14:40:41+5:302020-11-21T14:40:55+5:30
Coronavirus news अकोला जिल्ह्याचा मृत्यूदर स्थिर असून परभणी, कोल्हापूर, रत्नागिरी या सारख्या जिल्ह्यांचा मृत्यूदर काही प्रमाणात वाढला आहे.
अकोला: राज्यात मध्यंतरी कोरोना रुग्णसंख्या वाढीसोबतच मृत्यूदरही नियंत्रणात आला होता. हा आलेख आता पुन्हा वाढताना दिसून येत आहे; मात्र यात अकोला जिल्ह्याचा मृत्यूदर स्थिर असून परभणी, कोल्हापूर, रत्नागिरी या सारख्या जिल्ह्यांचा मृत्यूदर काही प्रमाणात वाढला आहे. विदर्भात मात्र सर्वाधिक मृत्यूदर अकोला जिल्ह्यातच असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोना रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वाढू लागला आहे. सोबतच काही जिल्ह्यांतील मृत्यूचा आकडाही वाढत आहे. राज्याचा मृत्यूदर २.६ टक्क्यांवर आला आहे. मध्यंतरी ही स्थिती नियंत्रणात होती; मात्र आता काही जिल्ह्यांमधील मृत्यूदर पुन्हा वाढायला लागला आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे राज्यात मुंबईतील मृत्यूदर ३.९ टक्के असून, हा राज्यात सर्वाधिक आहे. गत महिनाभरापूर्वी राज्यात मुंबई वगळता अकोला जिल्ह्याचा मृत्यूदर सर्वाधिक होता. गत दीड महिन्यात ही स्थितीत काही प्रमाणात नियंत्रणात ठेवण्यात स्थानिक आरोग्य विभागाला यश मिळाले. याच दरम्यान राज्यातील कोल्हापूर, ३.५, परभणी ३.६, रत्नागिरी ३.७ तसेच सोलापूर ३.४ टक्के मृत्यूदर झाला. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर अकोला जिल्ह्याच्या तुलनेत जास्त आहे. दुसरीकडे मात्र, विदर्भात अद्यापही कोरोनाच्या मृत्यूदरात अकोला जिल्हा पहिल्या स्थानी आहे. मृत्यूदराचा हा आकडा स्थिर असला, तरी दररोज मृत्यूचा वाढता आकडा चिंताजनक आहे.
नागपूरचा मृत्यूदर २.६ टक्क्यांवर
अकोला जिल्ह्यातील मृत्यूदर ३.३ टक्के असून, हा आकडा विदर्भात सर्वाधिक आहे. तर नागपूर जिल्ह्याचा मृत्यूदर २.६ टक्क्यांवर आहे. अमरावती जिल्ह्याचा मृत्यूदर २ टक्क्यांवर आहे.