CoronaVirus : पश्चिम विदर्भात सर्वाधिक मृत्यू अकोल्यात!
By atul.jaiswal | Published: July 27, 2020 10:01 AM2020-07-27T10:01:30+5:302020-07-27T10:05:15+5:30
पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत ६,३९१ रुग्ण आढळून आले असून, २१२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला : राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. विदर्भातही या जीवघेण्या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत ६,३९१ रुग्ण आढळून आले असून, २१२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक १०१ मृत्यू हे अकोला जिल्ह्यात झाल्याची नोंद आहे.
कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असतानाही या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये रविवार, २६ जुलैपर्यंत एकूण ६,२७१ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद असून, आतापर्यंत २१२ जणांचा मृत्यू झाला आहे. विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोला जिल्ह्यात रविवारपर्यंत १०१ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण रुग्णसंख्या २,४१२ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,९८० जण कोरोनामुक्त झाले असून, सध्या ३३१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सुरुवातीला अकोला शहरापुरता मर्यादित असलेल्या कोरोनाने आता ग्रामीण भागालाही विळख्यात घेतले आहे.
५० ते ७० वयोगटात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक
पहिला पॉझिटिव्ह रुग्ण एप्रिल महिन्यात आढळून आलेल्या अकोल्यात मे महिन्यापासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. जिल्ह्यात आतापर्यंत १०१ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी बहुतांश जण हे ५० ते ७० या वयोगटातील आहेत. शिवाय या रुग्णांना मधुमेह, अस्थमा, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचे विकार असल्याचेही समोर आले आहे.
अकोल्याचा रिकव्हरी रेट ७५ टक्क्यांवर
अकोल्यात एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. आतापर्यंत १,९६६ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचा दर ७५.४० टक्के असून, अकोला राज्यात चवथ्या क्रमांकावर आहे.
वाशिममध्ये स्थिती नियंत्रणात
संपूर्ण विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना, मे महिन्यापर्यंत वाशिममध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. जून व जुलै महिन्यात रुग्णांची संख्या वाढली असली, तरी इतर जिल्ह्यांंच्या तुलनेत स्थिती नियंत्रणात आहे. वाशिममध्ये आतापर्यंत ५३१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, ९ जणांचा मृत्यू झाला आहे. २९५ जण कोरोनामुक्त झाल्याने सध्या २४२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
बुलडाण्याने ओलांडला हजाराचा टप्पा
पश्चिम विदर्भात सर्वात पहिला रुग्ण बुलडाण्यात आढळून आला होता. त्यानंतर जून महिन्यापर्यंत बुलडाण्यात फारसे रुग्ण आढळले नव्हते. जून व जुलै महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली असून, आतापर्यंत जिल्ह्यात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १००५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, ६५३ जण कोरोनामुक्त झाल्याने सध्या ३२७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
अमरावती-यवतमाळात ७७ मृत्यू
पश्चिम विदर्भात अकोल्यानंतर सर्वाधिक मृत्यू अमरावती जिल्ह्यात झाले आहेत. अमरावती जिल्ह्यात रविवारपर्यंत एकूण ४९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत १,७०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत १,११३ जण कोरोनामुक्त झाले असून, ५७० जणांवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ७४३ रुग्ण आढळून आले असून, यापैकी २८ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४८० जणांनी कोरोनावर मात केली असून, सध्या २३८ जणांवर उपचार सुरू आहेत.
संपूर्ण विदर्भात ३०८ मृत्यू
मार्च महिन्यात संपूर्ण विदर्भात कोरोनामुळे फक्त एक जण दगावल्याची नोंद होती. मे, जून व जुलै महिन्यात मृत्यूचा आकडा वाढत जाऊन, २५ जुलैपर्यंत संपूर्ण विदर्भातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ३०८ वर पोहोचला. पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये २१२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये ९७ मृत्यूची नोंद आहे. सर्वाधिक ८६ मृत्यू हे नागपूर जिल्ह्यातील असून, त्यानंतर वर्धा - ९, गोेंदिया - ३, भंडारा -३, गडचिरोली - १ असा क्रम आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद नाही.