CoronaVirus : शिशूच्या जन्मानंतर आईचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’; नवजात शिशूचेही नमुने घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 09:57 AM2020-05-08T09:57:17+5:302020-05-08T09:57:32+5:30
जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूती झालेल्या एका मातेचे वैद्यकीय चाचणी अहवाल बुधवारी रात्री ‘पॉझिटिव्ह’ आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत असतानाच एका गर्भवतीला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब गुरुवारी समोर आली आहे. प्रसूतीनंतर या महिलेचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले असून, पाच दिवसांनंतर नवजात शिशूचेही नमुने चाचणीसाठी घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
गत आठवड्यापासून शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूती झालेल्या एका मातेचे वैद्यकीय चाचणी अहवाल बुधवारी रात्री ‘पॉझिटिव्ह’ आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ही गर्भवती अकोट फैल परिसरातील रहिवासी असून, बुधवारी दुपारीच तिची प्रसूती झाली होती. रात्री अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यानंतर त्या मातेला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. नवजात शिशूला ‘एसएनसीयू’मध्ये ठेवण्यात आले असून, पाच दिवसांनंतर त्या बाळाचे ‘स्वॅब’ घेण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. अकोला जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे अकोलेकरांची चिंता वाढली असून, त्या चिमुकल्याच्या वैद्यकीय चाचणी अहवालाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
शिशूला आईचे दूध चालते; पण...
नवजात शिशू फोरमच्या मार्गदर्शक अहवालानुसार, कोरोना संदिग्ध किंवा बाधित माता असेल तरी, त्या मातेचे दूध नवजात शिशूला देता येते; परंतु शिशूला दूध देण्यापूर्वी मातेने आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करण्याची गरज आहे.
‘लेडी हार्डिंग’मध्ये विशेष खबरदारी
जिल्हा स्त्री रुग्णालयात जिल्ह्यातीलच नव्हे, तर शेजारील जिल्ह्यातील गर्भवतीदेखील प्रसूतीसाठी मोठ्या संख्येने येतात. अशा परिस्थितीत कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रातून येणाऱ्या गर्भवतींसाठी स्वतंत्र वॉर्डाची निर्मिती करण्यात आली आहे. शिवाय, प्रत्येक गर्भवतींचे स्क्रीनिंग केले जात आहे.
यापूर्वी १२ गर्भवतींचे अहवाल ‘निगेटिव्ह’!
जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल गर्भवतींचे नियमित स्क्रीनिंग केले जाते. या माध्यमातून आतापर्यंत १३ गर्भवतींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यातील एका गर्भवतीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’, तर १२ गर्भवतींचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत.
अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याचे कळताच संबंधित मातेला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. गर्भवतींना कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा स्त्री रुग्णालयात आधीच विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. शिवाय, प्रतिबंधित क्षेत्रातून येणाºया गर्भवतींसाठी स्वतंत्र वॉर्डाची निर्मिती केल्याने इतरांना त्याचा धोका नाही.
- डॉ. आरती कुलवाल,
वैद्यकीय अधीक्षिका,
जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.