'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग'मध्ये आली शिथिलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 10:42 AM2020-09-08T10:42:47+5:302020-09-08T10:43:18+5:30

वाढत्या रुग्णसंख्येमुळे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ कडेही कानाडोळा होण्याचे प्रमाण वाढले असून, संपर्कातील नागरिकांनी स्वॅब दिले की नाही, याची पडताळणी करण्यात दिरंगाई होत आहे.

CoronaVirus : Neglegence towards contact tracing in Akola | 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग'मध्ये आली शिथिलता

'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग'मध्ये आली शिथिलता

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढताच आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सात दिवसाच रुग्णांची संख्या ५७६ च्या वर गेली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढती असताना त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेताना यंत्रणांची दमछाक होत आहे. दुसरीकडे वाढत्या रुग्णसंख्येमुळे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ कडेही कानाडोळा होण्याचे प्रमाण वाढले असून, संपर्कातील नागरिकांनी स्वॅब दिले की नाही, याची पडताळणी करण्यात दिरंगाई होत आहे.
सध्या जिल्हाभरात रॅपिड अ‍ॅन्टिजन, ट्रुनेट व आरटी-पीसीआरद्वारे चाचण्या होत आहे. रुग्णांची वाढती संख्या तसेच मृत्यूची संख्या लक्षात घेता चाचण्यांचा वेगही वाढविण्यात आला आहे; मात्र आरोग्य यंत्रणाचे सध्याचे नियोजन मात्र अपुरे पडत आहे. त्याला अपुरे मनुष्यबळ व आरोग्य यंत्रणेवर दोन महिन्यात वाढलेला ताण याचाही फटका ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ला होत आहे.
ज्या भागात रुग्णांची नोंद झाली त्या भागातील आरोग्य केंद्राद्वारे त्वरित उपाययोजना होणे, हायरिस्क रुग्णांशी संवाद साधून त्यांना स्वॅब देण्यासाठी पाठविणे, प्रसंगी केंद्रावर घेऊन जाणे महत्त्वाचे आहे. कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात या संदर्भात तत्परता होती; मात्र आता वाढत्या रुग्णसंख्येमुळे ही तत्परता कमी झाल्याचे दिसत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविल्यास संक्रमणावर नियंत्रण येऊ शकेल. त्यामुळे या प्रक्रियेचा नव्याने आढावा घेण्याची गरज आहे.
बॉक्स...
संपर्कातील व्यक्तींचाही टेस्ट टाळण्यावर भर
कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करावी असे बंधन आहे. खासगी कार्यालये, प्रतिष्ठानांमधील अनेकांनी मात्र या टेस्टला बगल दिली. अशा व्यक्ती कोरोनाचा प्रसार करू शकतात. असे अनेक ‘कोरोना बॉम्ब’ शहरात, जिल्ह्यात फिरत आहेत. टेस्ट केली की हमखास पॉझिटिव्ह येते, असा गैरसमज काही जण जाणीवपूर्वक पसरवत असल्याने सौम्य लक्षणे असणाऱ्या अनेकांनी टेस्ट टाळण्यावरच भर दिल्याची माहिती आहे. गृह विलगीकरणातील पॉझिटिव्ह रुग्ण असिम्टोमॅटिक असल्याने ते बाहेर पडल्यास कोरोनाचा प्रसार थांबणार नाही.
बॉक्स...
होम क्वारंटीन रुग्णांबाबत हवी अधिक काळजी
जिल्ह्यातील ३५ च्या वर रुग्णांनी होम क्वारंटीनची सुविधा घेतली आहे. या रुग्णांना १८ दिवस वेगळ्या खोलीत राहावे लागते. या रुग्णाच्या घराला याविषयीचे बोर्ड लावावे, यासह अन्य महत्त्वाचे निर्देश आहेत; मात्र अशा संक्रमित व्यक्तींच्या घराला बोर्ड लावण्यात आलेले नाही. त्यामुळे या रुग्णांविषयी परिसरातील नागरिक अनभिज्ञ आहेत.

ल्ल कोट....
ल्ल कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसंदर्भात मनपा तसेच आरोग्य विभागाचे पथक दक्ष आहे; मात्र रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनीही स्वत:सह परिवार व समाजाच्या हितासाठी टेस्टसाठी पुढे येणे आवश्यक आहे, तरच कोरोनाच्या संक्रमणावर अधिक वेगाने नियंत्रण शक्य होईल.
ल्ल - संजय कापडणीस, मनपा आयुक्त

Web Title: CoronaVirus : Neglegence towards contact tracing in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.