CoronaVirus: डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांकडून नाही संसर्गाचा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 04:34 PM2020-08-14T16:34:50+5:302020-08-14T16:35:01+5:30
कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
अकोला: आयसीएमआरच्या निर्देशानुसार, कोरोनाबाधित रुग्णाला लक्षणे नसतील तर त्यांना दहाव्या दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्या जातो. या रुग्णांची पुन्हा चाचणी होत नसल्याने ते पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह] याबाबत स्पष्ट सांगता येत नाही; मात्र त्यांच्यापासून कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
लक्षणं नाहीत म्हणून कोरोना बाधित रुग्णाला उपचाराच्या दहाव्या दिवशी चाचणी न करताच रुग्णालयातून सुट्टी दिली जाते. त्यामुळे अनेक जण त्या रुग्णापासून लांबच राहत असल्याचे चित्र दिसून येते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, डिस्चार्ज मिळालेला रुग्ण हा पूर्णत: कोरोना निगेटिव्ह नसला, तरी त्यापासून इतरांना संसर्गाचा धोका नाही; मात्र ज्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून दहा दिवसांपेक्षा जास्त काळ होऊनही लक्षणं कायम आहेत, अशा रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली जात नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या व्यक्तींपासून दुरावा न बाळगता त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.