CoronaVirus : आता पॉझिटिव्ह रुग्णांना आणण्याची जबाबदारी 'जीएमसी'वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 10:13 AM2020-05-13T10:13:01+5:302020-05-13T12:24:39+5:30
शहरात कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणाºया रुग्णांना आणण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनावर निश्चित केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरातील कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करणे तसेच त्यांच्या निकटवर्तीयांचा शोध घेण्याची महापालिकेला करावी लागणारी कसरत आता थांबणार असून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शहरात कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणाºया रुग्णांना आणण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनावर निश्चित केली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणाºया रुग्णांचा शोध घेणे व त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाची असताना महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन आजपर्यंत ही सर्व प्रक्रिया इमानेइतबारे पार पडल्याचे दिसून आले आहे. परंतु रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता महापालिकेला कंटेनमेंट झोन वाढवावे लागत असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. महापालिकेची होत असलेली दमछाक लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी शहरातील कोरोना पॉझिटिव रुग्णांना आणण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालयकडे सोपवली आहे. यासोबतच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे तसेच भूमिअभिलेख विभागातील उपअधीक्षक योगेश कुलकर्णी यांच्यावर रुग्णांना आणून त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी निश्चित करण्याचा आदेश जारी केला आहे.
मनपाचे 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग'वर लक्ष
रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच मनपाची यंत्रणा कामाला लागत होती. संबंधित भागाचे सर्वेक्षण करून नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी मनपाचे शिक्षक आशा वर्कर यांची नियुक्ती केली जात आहे. यामध्ये कोरोना बाधित रुग्णाचे निकटवर्तीय तसेच त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मनपाची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुधारित आदेशामुळे मनपाला काही अंशी दिलासा मिळाला असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर मनपा लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती आहे.
सिंधी कॅम्प वासियांना दिलासा
सिंधी कॅम्प मधील पक्की खोली भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. ही बाब लक्षात घेता भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक हरीश आलीमचंदानी यांनी पुढाकार घेत सिंधी कॅम्प भागात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी 83 जणांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येऊन काही संशयित रुग्णांचे नमुने सामान्य रुग्णालय कडे पाठविले असता या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सिंधी कॅम्पवासियांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.