CoronaVirus : चार महिन्यात २५ हजारांवर चाचण्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 10:36 AM2020-08-05T10:36:58+5:302020-08-05T10:38:54+5:30
१२ एप्रिलपासून चाचण्यांना सुरुवात झाली असून, आतापर्यंत तब्बल २५ हजार ५०० चाचण्या करण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयांमध्ये व्हीआरडीएल लॅब सुरू होऊन जवळपास चार महिन्यांचा कालावधी झाला आहे. जवळपास २५ हजार ५०० चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील तीन हजार अहवाल पॉझिटिव्ह आले असून, २३३२ अहवाल अकोला जिल्ह्यातील आहेत.
आयसीएमआरच्या परवानगीनुसार, १२ एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील व्हीआरडीएल लॅब सुरू करण्यात आली. इतर लॅबच्या तुलनेत अकोल्यातील लॅबला मनुष्यबळही कमीच मिळाले. या आधारावर अकोल्यातील आणि आरडीएल लॅबमध्ये कोरोनाच्या चाचण्या करण्यास सुरुवात करण्यात आली. कोरोनाचा जिल्ह्यात झपाट्याने प्रसार होत असताना वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यातीलही नमुने चाचणीसाठी अकोल्यात येऊ लागले. अशा परिस्थितीतही रात्रंदिवस काम करत व्हीआरडीएलमधील कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या यशस्वी चाचण्या केल्यात. १२ एप्रिलपासून चाचण्यांना सुरुवात झाली असून, आतापर्यंत तब्बल २५ हजार ५०० चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अकोलासह बुलडाणा, वाशिम या जिल्ह्याचाही समावेश आहे.
मध्यंतरी अमरावती, यवतमाळ आणि जळगाव येथीलही नमुने चाचण्यांसाठी अकोला व्हीआरडीएलमध्ये तपासण्यात आलेत; मात्र यावरील वाढता ताण पाहता, अमरावती यवतमाळ आणि जळगाव या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली; मात्र तरीदेखील जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातल्याने चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला, त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळात रात्रंदिवस नमुन्यांची तपासणी केली.
एकही दिवस घेतली नाही सुट्टी!
अकोल्यातील व्हीआरडीएल लॅबमध्ये आठ तंत्रज्ञ आणि चार विशेषज्ञ काम करत आहेत. अकोलासह बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातही कोरोनाचा कहर वाढल्याने चाचण्यांचे प्रमाणही वाढवावे लागले. त्यामुळे लॅबमधील कर्मचाऱ्यांनी एकही दिवस सुट्टी न घेता रात्रंदिवस चाचण्या केल्यात. राज्यातील इतर लॅबच्या तुलनेत अकोल्यातील व्हीआरडीएल लॅबमध्ये मनुष्यबळ कमी आहे; मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
रॅपिड अॅन्टिजनमुळे वाढला चाचण्यांचा वेग!
जिल्ह्यात जवळपास महिनाभरापासून रॅपिड अॅन्टीजन टेस्ट घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चाचण्यांचा वेग वाढला आहे. परिणामी पॉझिटिव्ह रुग्णांचेही वेळेत निदान होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७८४८ चाचण्या झाल्या असून, त्यापैकी ३७५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.