CoronaVirus : तपासणीसाठी आणलेल्या रुग्णाची सर्वोपचार रुग्णालयात ससेहोलपट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 10:29 AM2020-05-22T10:29:03+5:302020-05-22T10:29:25+5:30
बुधवारी रात्री सर्वोपचार रुग्णालयात आणले; परंतु रात्री वैद्यकीय तपासणी न करता सकाळी येण्यास सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: एका युवकाची पत्नी तीन महिन्यांपासून अकोल्यात माहेर असलेल्या ठिकाणी आहे. त्याची पत्नी ‘पॉझिटिव्ह’ निघाली. तीन महिन्यांपासून पत्नीसोबत प्रत्यक्षात संपर्क नसताना, प्रशासनाने युवकाला कोरोना तपासणीसाठी बुधवारी रात्री सर्वोपचार रुग्णालयात आणले; परंतु रात्री वैद्यकीय तपासणी न करता सकाळी येण्यास सांगितले. युवकाला वाऱ्यावर सोडून दिल्यामुळे त्याला रुग्णालय परिसरातील मैदानात बसूनच रात्र काढावी लागल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
एका युवकाची पत्नी तीन महिन्यांपूर्वी बाळंतपणासाठी अकोल्यात माहेरी आली. तेव्हापासून ती माहेरीच आहे. तिच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने बुधवारी तिला उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तिचा रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आल्यामुळे तिच्या संपर्कातील सर्वांना रुग्णालयात दाखल केले. गावात वास्तव्याला असलेल्या तिच्या पतीलासुद्धा बाधा झाल्याच्या संशयानुसार बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास, मुंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून सर्वोपचार रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी आल्यावर या युवकाला आता तपासणी होत नाही. तुम्ही सकाळी या, असे सांगण्यात आले. यावर त्या युवकाने तीन महिन्यांपासून मी पत्नीच्या प्रत्यक्ष संपर्कात नाही. मला कोणतीही लागण नाही. आता रात्री मी कुठे जाऊ, गाव दूर आहे. असे सांगितल्यावरही त्याचे काहीही ऐकून घेण्यात आले नाही. अखेर युवकाने रुग्णालय परिसरातील मैदानात बसूनच रात्र काढली. सकाळी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. युवक ठणठणीत असल्याचे दिसून आल्यावर त्याला परत गावी सोडून देण्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची असतानासुद्धा त्याला एका दुचाकीने पाचमोरी फाट्यापर्यंत सोडून देण्यात आले. युवकाने अशा परिस्थितीत मी गावी कसा जाऊ, असे विचारल्यावर आता पुढे जाण्याची व्यवस्था तुमची तुम्हीच करा, असा सल्ला देण्यात आला. गावी जाण्यासाठी कोणतेही वाहन नाही. अशा परिस्थितीत संबंधित युवकाने पायीच गावचा रस्ता धरला. कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णाच्या नातेवाइकाला प्रशासनाच्या गलथान कारभाराचा नाहक त्रास सहन करावा लागला. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
मालवाहू वाहनाने गाठले गाव!
पाचमोरी फाट्यावर दुचाकीवर सोडून दिल्यानंतर अडगाव येथील युवकाने पायीच प्रवास सुरू केला. उगवा फाट्याजवळ एका मालवाहू वाहन चालकाला विनंती केल्यावर त्याने अकोटपर्यंत सोडून दिले. नंतर युवकाने गावातून दुचाकी बोलावून गाव गाठले.
‘कोरोना’वर नियंत्रण मिळविण्यात येत आहे अपयश!
कोरोनाबाधित महिलेच्या पतीला संदिग्ध रुग्ण म्हणून बुधवारी रात्री सर्वोपचार रुग्णालयात आणले; परंतु त्याची रात्री तपासणी न करता सकाळी येण्यास बजावले. कोरोनाबाधित रुग्णाचा नातेवाईक आणि त्यात संदिग्ध रुग्ण असतानासुद्धा प्रशासनाने त्याला वाºयावर सोडले. सुदैवाने महिलेचा पती संपर्कात नव्हता. संपर्कात असता, तर रुग्णालय परिसरातील इतरांनासुद्धा कोरोनाची बाधा झाली असती. प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे अकोल्यातील कोरोनाबाधित संख्येवर नियंत्रण मिळविण्यात अपयश येत आहे.