CoronaVirus : ‘त्या’ रुग्णावर झाली होती नागपूर येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 10:03 AM2020-04-27T10:03:07+5:302020-04-27T10:04:56+5:30
दीड महिना उलटून गेल्यानंतर त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने मनपा प्रशासन चक्रावून गेले आहे.
- आशिष गावंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला:सिंधी कॅम्पमधील पक्की खोली परिसरातील किराणा व्यावसायिकाला कोरोनाची लागण झाली कशी, हा व्यक्ती नेमका कोणाकोणाच्या संपर्कात आला होता, याची ‘हिस्ट्री’ शोधण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
सदर व्यक्ती फेब्रुवारी महिन्यात गोवा येथे गेल्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात त्याच्यावर नागपूर येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे दीड महिना उलटून गेल्यानंतर त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने मनपा प्रशासन चक्रावून गेले आहे.
शहरातील सिंधी कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात उच्चभ्रू व्यावसायिक राहतात. कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णाचे जीएमडी मार्केटमध्ये मोठे किराणा दुकान असून, या ठिकाणी फळांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. याव्यतिरिक्त लहान मुलांच्या खेळण्यांचीही विक्री होते. या भागातील रामनगर, तोष्णीवाल ले-आउट, जवाहर नगर, शास्त्री नगर, सुधीर कॉलनी आदी भागातील रहिवाशांकडून याच दुकानातून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे मागील आठ-दहा दिवसांमध्ये या किराणा दुकानातून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणाऱ्यांची संख्या नेमकी किती आहे, याचा शोध मनपाच्या स्तरावर घेतला जात आहे. त्या पृष्ठभूमीवर संबंधित भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन मनपाकडून विचारपूस करण्याचे काम सुरू झाले आहे.
नागपूर महापालिकेसोबत संपर्क
कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णावर मार्च महिन्यातील दुसºया आठवड्यात नागपूर येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याची माहिती घेतल्यानंतर रविवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी नागपूर महापालिकेसोबत संपर्क साधून या विषयावर सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे.
दुकानातून साहित्य घेणारे ‘लो रिस्क’मध्ये
गत १५ ते २० दिवसांच्या कालावधीमध्ये संबंधित व्यावसायिकाच्या किराणा दुकानातून जीवनावश्यक वस्तूंसह विविध खाद्यपदार्थ व लहान मुलांची खेळणी खरेदी करणाºया सर्व ग्राहकांचा समावेश ‘लो रिस्क’मध्ये होतो. अशा संबंधित ग्राहकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
किराणा दुकानातील पाच जण ‘आयसोलेशन’ कक्षात
संबंधित व्यावसायिकाच्या किराणा दुकानात काम करणारे पाच कर्मचारी तसेच कुटुंबातील काही व्यक्तींसह संपर्कात आलेले तीन डॉक्टर अशा एकूण २८ जणांना उपचारासाठी ‘आयसोलेशन’ कक्षात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
गत आठ-दहा दिवसांत संबंधित व्यक्तीच्या किराणा दुकानातून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणाºया नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, नाकातून पाणी येणे अशी किरकोळ लक्षणे आढळून आल्यास महापालिका किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनासोबत संपर्क साधावा, जेणेकरून त्यांच्या मनातील शंका दूर केल्या जातील.
- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.
कोरोनाची लागण नेमकी झाली कोठे?
सिंधी कॅम्पमधील व्यावसायिकावर झालेल्या शस्त्रक्रियेचा कालावधी लक्षात घेता दीड महिन्यानंतर या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय व महापालिका प्रशासन बुचकळ्यात पडले आहे. या प्रकारामुळे दुकानात साहित्य खरेदीसाठी आलेला एखादा व्यक्ती कोरोनाचा ‘कॅरियर’ (वाहक) होता का, याकडेही मनपा प्रशासनाने लक्ष केंद्रित केल्याची माहिती आहे.