Coronavirus : अधिकारी-कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या वस्तू वापरण्यास प्रतिबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 10:19 AM2020-04-27T10:19:21+5:302020-04-27T10:19:27+5:30
एकमेकांचा मोबाइल तसेच इतर वस्तू वापरण्यास आरोग्य विभागाने प्रतिबंध घातला आहे.
अकोला : राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याने शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून एकमेकांचा मोबाइल तसेच इतर वस्तू वापरण्यास आरोग्य विभागाने प्रतिबंध घातला आहे. सोबतच कार्यालयांमध्ये प्रतिबंधक उपाययोजनांसाठी आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचाही आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांनी शनिवारी दिला आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाची साथ सुरू आहे. या आपत्कालीन परिस्थितीत शासनाच्या विविध कार्यालयांत अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये आरोग्य, पोलीस, स्वच्छता, महसूल, ग्रामविकास, शिधावाटप विभागाचा समावेश आहे. त्यापैकी काहींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने त्याबाबत सर्व विभागासाठी एकत्रित आदेश देत विविध निर्देश दिले आहेत. त्यानुसार अधिकारी-कर्मचाºयांनी कार्यालयात जाताना गणवेशासोबतच मास्क, हातमोजे, अॅप्रन परिधान करावा, कामाच्या ठिकाणी साबण, पाणी, हॅण्ड सॅनिटायझर उपलब्ध असल्याची खात्री करावी, कामाला सुरुवात करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे, त्यानंतर हातमोज्यांचा वापर करावा, हाताने चेहरा, नाक, तोंडास स्पर्श करू नये, वारंवार हाताचा स्पर्श होणाºया वस्तू दोन ते तीन तासाने सोडियम हायपोक्लोराइडने स्वच्छ कराव्या, कर्तव्याच्या ठिकाणी आंघोळीची सुविधा नसल्यास घरी गेल्यावर आंघोळ करावी, यासह विविध उपाय करण्याचेही बजावले आहे.
मोबाइलचा स्पर्शही टाळा!
कार्यालयात मोबाइलचा वापर करताना त्याचा चेहºयाला स्पर्श होणार नाही, त्यासाठी स्पीकरफोनचा वापर करावा, दोन व्यक्तींमधील अंतर एक मीटर ठेवावे, सर्वांनी एकमेकांचे मोबाइल फोन, रुमाल, पाणी बॉटल, ग्लास या वस्तूंचा वापर करू नये, असेही बजावण्यात आले आहे.
कार्यालयात सुविधा उपलब्ध करा!
कार्यालयात उपस्थित राहणाºयांसाठी विभाग प्रमुखांनी अधिकारी-कर्मचाºयांसाठी तांत्रिक क्षमतेचे पर्सनल प्रोटेक्टिव्ह किट, हातमोजे, अॅप्रन, स्वच्छता कर्मचाºयांसाठी गमबूट, जॅकेट, रबरी हातमोजे, मास्क, साबण, सॅनिटायझरचा पुरवठा करण्याचेही आदेशात म्हटले आहे.