CoronaVirus : पालकमंत्र्यांवर नागरिकांकडून सूचनांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:01 AM2020-06-17T10:01:12+5:302020-06-17T10:20:12+5:30
पालकमंत्री बच्चू कडू व विविध सामाजिक संस्था व नागरिकांदरम्यान मंगळवारी पार पडलेल्या मुक्त चर्चेत पालकमंत्र्यांना नागरिकांकडून सूचनांचा अक्षरश: पाऊस पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासंदर्भात तसेच नागरिकांमध्ये असलेली भीती दूर करून विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पालकमंत्री बच्चू कडू व विविध सामाजिक संस्था व नागरिकांदरम्यान मंगळवारी पार पडलेल्या मुक्त चर्चेत पालकमंत्र्यांना नागरिकांकडून सूचनांचा अक्षरश: पाऊस पडला. पालकमंत्री बच्चू कडू यांनीही प्रशासनासह सर्वांचीच चूक झाल्याचे कबूल करत नागरिकांच्या सूचनांची दखल घेण्याची ग्वाही दिली.
स्थानिक नेहरू पार्कच्या हिरवळीवर मंगळवारी ‘कोरोना : उपाय व समस्या’ या विषयावर मुक्त चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंचावर पालकमंत्री बच्चू कडू, आमदार अमोल मिटकरी, डॉ. गजानन नारे, ज्येष्ठ समाजसेवक महादेवराव भुईभार, बी. एस. देशमुख व राजाभाऊ देशमुख उपस्थित होते. यावेळी युवा राष्ट्र संघटनेकडून डॉ. नीलेश पाटील यांनी तयार केलेला उपाययोजनांसदर्भातील ‘अॅक्शन प्लॅन’ पालकमंत्र्यांना सादर केला. चर्चेला उपस्थित नागरिकांनी विविध सूचना लेखी स्वरूपात पालकमंत्र्यांकडे सादर केल्या. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याच्या तक्रारींचा पाढाच नागरिकांनी सूचनांमधून मांडला. सर्वोपचार रुग्णालय, कोविड केअर सेंटरमधील असुविधांकडे लक्ष वेधले. रोजगाराबाबत आॅनलाइन मार्गदर्शन करण्यासाठी सामाजिक संघटना तयार असल्याचे डॉ. गजानन नारे यांनी सांगितले.
समन्वयासाठी लोकसहभाग सेल स्थापन करण्याची सूचना गणेश बोरकर यांनी केली. शहरातील भाजीपाला व्यावसायिकांसाठी वर्धा पॅटर्नप्रमाणे व्यवस्था करावी, असे मत सुधीर रांदड यांनी व्यक्त केले.
गरजूंसाठी धान्य बँकेची कल्पनाही यावेळी मांडण्यात आली. प्रशांत गावंडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. तर धनंजय मिश्रा यांनी संचालन केले. दरम्यान, या बैठकीत स्वयंसेवी संस्थांनाकडून प्रतिबंधित क्षेत्र दत्तक घेण्याबाबत सकारात्मक पुढाकार दाखविण्यात आला.
आता ‘बच्चू कडू स्टाइल’ हवी - हुसेन
कोरोनाबाधितांच्या आजवरच्या अनुभवांवरून लोकांचा सर्वोपचार रुग्णालयांवरील विश्वास उडाला आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने खासगी रुग्णालयांकडून पूर्णपणे सेवा घेणे गरजेचे आहे, असे मत नगरसेवक डॉ. झिशान हुसेन यांनी व्यक्त केले. अकोलेकरांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पुन्हा आपली बच्चू कडू स्टाइल अंगीकारा, अशी विनंतीही झिशान हुसेन यांनी केली.
ही वेळ चुका काढण्याची नव्हे - पालकमंत्री
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन व प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जनजागृतीही मोठ्या प्रमाणात होत आहे; परंतु लोकांकडून नियमांचे पालन होत नाही. तसेच प्रशासनाकडूनही काही चुका निश्चित झाल्या. चुका सर्वांकडूनच झाल्या; पण ही वेळ चुका काढण्याची नाही, असे यावेळी पालकमंत्री म्हणाले. ३५ लाख लोकसंख्येच्या नागपुरात साडेपाच हजार चाचण्या झाल्या, तर ५ लाख लोकसंख्येच्या अकोल्यात ७ हजारावर चाचण्या झाल्या. त्यामुळे अकोल्यात रुग्णसंख्या वाढलेली दिसत आहे, असे सांगत सर्वांचे सहकार्य राहिले तर लवकरच अकोला कोरोनामुक्त होईल, अशी आशा व्यक्त केली.