Coronavirus : रामदासपेठ ठाण्याचे १० पोलीस ‘होम क्वारंटीन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 04:48 PM2020-05-13T16:48:09+5:302020-05-13T16:48:21+5:30
रामदासपेठ पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ निघाला आहे.
अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक यांना कोरोना ‘पॉझिटिव्ह’ची लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल केले होते. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबीयांसह ठाण्यातील दहा पोलिसांनाही ‘होम क्वारंटीन’च्या सूचना दिल्या असून, त्यांना रजेवर पाठविण्यात आले आहे. शहरात कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ असलेला बैदपुरा परिसर हा रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. सर्वाधिक कोरोना रुग्ण याच परिसरातून असून, कोरोनामुळे मृत्यू झालेले रुग्णही मोठ्या प्रमाणात याच परिसरातील आहेत. त्यामुळे या परिसराची संपूर्ण जबाबदारी असलेल्या रामदासपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस संपर्कात आले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून रामदासपेठ पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ निघाला आहे. पोलीस पॉझिटिव्ह निघाल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे पोलीस वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना सुरक्षेच्या नव्या दृष्टीने सुविधाही पुरविण्यात येत आहेत. तसेच रामदासपेठ पोलीस ठाणेही सॅनिटाइझ करण्यात आले.
पोलिसांची टेस्ट करून तणाव कमी करण्याची गरज!
कोरोना फायटर्समध्ये पोलीस हा महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्याला रुग्णालयात पोहोचविण्याचीही जबाबदारी पोलिसांवर येऊन ठेपली आहे. तसेच कंटेनमेंट झोनमध्ये पोलिसांचा खडा पहारा आहे. त्यामुळे येणारे-जाणारे सहजच पोलिसांच्या संपर्कात येतात. त्यामुळे पोलिसांची कोरोना टेस्ट करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे ड्युटीचे तासही अधिक असल्याने त्यांना आरामाची गरज आहे. म्हणून पोलीस तणावमुक्त कसे राहतील, याचाही विचार करण्याची गरज आहे.