CoronaVirus : ‘रॅपिड टेस्टिंग’ला अकोला जिल्ह्यात प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 10:17 AM2020-07-06T10:17:16+5:302020-07-06T10:18:14+5:30

रविवारी पातूर तालुक्यातील कंटेनमेन्ट झोनमध्ये कोरोनाच्या रॅपिड टेस्टला सुरुवात करण्यात आली.

CoronaVirus: 'Rapid Testing' Launched in Akola District! | CoronaVirus : ‘रॅपिड टेस्टिंग’ला अकोला जिल्ह्यात प्रारंभ!

CoronaVirus : ‘रॅपिड टेस्टिंग’ला अकोला जिल्ह्यात प्रारंभ!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात झपाट्याने होणारा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आता चाचण्यांचा वेगही वाढविला जात आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्याला ५०० हजार ‘रॅपिड टेस्ट किट’ उपलब्ध झाल्या असून, आणखी दोन हजार किट मिळणार आहे. जिल्ह्याला प्रत्यक्षात आणखी १० हजार किटची प्रतीक्षा आहे. उपलब्ध किटच्या माध्यमातून रविवारी पातूर तालुक्यातील कंटेनमेन्ट झोनमध्ये कोरोनाच्या रॅपिड टेस्टला सुरुवात करण्यात आली.
सध्या कोविड रुग्णांच्या चाचणीसाठी अचूकता व एकाच वेळी चार ते पाच तासांच्या कालावधीत ९० नमुने तपासणीची क्षमता असणाऱ्या ‘रिअल टाइम- आरटीपीसीआर’ या प्रणालीचा उपयोग केला जातो. ही चाचणी उत्तम असली, तरी वाढत्या रुग्णसंख्येचा वेग पाहता आणखी जलद गतीने तपासण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी राज्य शासनाने ‘रॅपिड अ‍ॅन्टीजन बेस्ड’ तत्त्वावर आधारित चाचणी प्रणालीला मान्यता दिल्याने आता थेट कंटेनमेन्ट झोनमध्येच संदिग्ध रुग्णांची कोरोना चाचणी केली जात आहे. जिल्ह्याला २,५०० ‘रॅपिड अ‍ॅन्टीजन बेस्ड’ किट उपलब्ध झाल्या असून, त्या माध्यमातून पातूर तालुक्यातील कंटेनमेन्ट झोनमधून रॅपिड टेस्टिंगला सुरुवात करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात अकोला शहरासह जिल्ह्यातील इतरही तालुक्यात ‘रॅपिड टेस्ट’ किटच्या साहाय्याने कोरोनाची चाचणी केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.


किट मिळण्यास होत आहे विलंब
‘रॅपिड टेस्ट किट’ मिळण्यास विलंब होत असल्याने कंटेनमेन्ट झोनमधील हायरिस्क रुग्णांची तपासणी उशिरा होत आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव आणखी वेगाने होत आहे. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेतर्फे १० हजारपेक्षा जास्त रॅपिड टेस्ट किटची मागणी केली होती; परंतु त्यापैकी केवळ ५०० किट उपलब्ध झाल्या आहेत.


पातुरात ११ जण पॉझिटिव्ह!
पातूर : रॅपिड अँटीजन टेस्टचा वापर सर्वप्रथम पातूर येथील स्वॅब कलेक्शन सेंटर वर करण्यात आला.याठिकाणी २२१ जणांचे नमुने तपासल्यानंतर त्यातील ११ जण पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण यांनी दिली.
रविवारी नागरिकांनी घशातील स्रावाचे नमुने दिले. रॅपिड टेस्ट पद्धतीमुळे पातुरात नागरिकांच्या घशातील स्रावाचे नमुने घेतल्यानंतर पहिल्या अर्धा तासातच सहा जण पॉझिटिव्ह आढळून आले. संध्याकाळपर्यंत ही संख्या ११ वर गेली आहे. उर्दू शाळा क्रमांक एक आणि मराठी शाळा क्रमांक १ या दोन ठिकाणी नमुने संकलनाचे केंद्र उभारण्यात आले आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जाधव यांनी दिली. दरम्यान, पातुरात मंगळवारी लक्ष्मीबाई देशपांडे शाळा आणि न.प. शाळा क्रमांक २ याठिकाणी रॅपिड टेस्ट शिबिर आयोजित केले आहे.


अशी होते ‘रॅपिड टेस्ट’
या चाचणीत संदिग्ध व्यक्तीच्या नाकाच्या आतील स्त्राव घेतला जातो. हा स्त्राव व्हिटीएम (श््र१ं’ ळ१ंल्ल२ाी१ टी्िरं) द्रावणात मिसळला जातो. या द्रावणाचे किटच्या टेस्ट पट्टीच्या एका टोकाला टाकला जातो. या पट्टीच्या दुसºया टोकाला एक बारीक गुलाबी रेघ असते. सुमारे २५ ते ३० मिनिटात स्त्राव मिश्रीत द्रावण हे पट्टीच्या वरच्या भागापर्यंत पोहोचते. तर तेथे आणखी एक गुलाबी रेघ तयार झाली तर स्त्राव नमुना पॉझिटिव्ह आहे, असे समजले जाते, असे डॉ.चव्हाण यांनी सांगितले.

जिल्ह्याला ५०० रॅपिड टेस्ट किट उपलब्ध झाल्या आहेत. त्यानुसार पातूर येथील कंटेनमेन्ट झोनमधून तपासणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. यामुळे कोरोना चाचणीचा वेग वाढविण्यास मदत होईलच, शिवाय रुग्णांच्या वाढत्या संख्येवर अंकुश लावण्यासही मदत होईल.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

 

Web Title: CoronaVirus: 'Rapid Testing' Launched in Akola District!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.