CoronaVirus : स्वत:च्या चिमुकल्याचा अहवाल पॉझिटिव्ह दिसला, अन पायाखालची जमीनच सरकली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 04:42 PM2020-05-25T16:42:42+5:302020-05-25T16:43:22+5:30
CoronaVirus : इतरांचे अहवाल पाहताना स्वत:च्या चिमुकल्याचा अहवाल दिसला पॉझिटिव्ह.
अकोला : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात कार्यरत एक कोरोना योद्धा इतरांच्या अहवालांची संगणकावर पाहणी करताना त्याला स्वत:च्याच चिमुकल्याचा रिपोर्ट पॉझिटिव दिसतो तेव्हा त्या पित्याचे काय हाल होत असतील याचा अंदाज रविवारी त्या वैद्यकीय कर्मचाऱ्याने फेसबुकवर टाकलेल्या पोस्टवरून लावता येतो ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
स्वत:च्या मुलाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट पाहणारा वैद्यकीय कर्मचारी पोस्टमध्ये लिहीतो की, चार दिवसांपूर्वी त्याला ताप असल्याने बालरोगतज्ञाकडे नेले. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रही होते. तेथून घराकडे परतताना हॉस्पिटलमध्ये त्याचा स्वॅब देऊन घरी आलो. त्याचा ताप कमी झाला तो पुन्हा मित्रांसह खेळायलाही लागला. दोन दिवसानी मी आॅफिसमध्ये कॉम्प्युटरवर कोरोनाचे रिपोर्ट पाहत होतो. अचानक माझ्या मुलाचा व त्याच्या दोन मित्रांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे दिसले व पायाखालची जमीनच हलली. कसंतरी स्वत:ला सांभाळत जराही चेहºयावर रडू न येता घरी आलो. वाटेत मुलीचा फोन आला. बाबा त्याचा रिपोर्ट काय आला ? फोनवर तिला सांगता येत नव्हतं. घरी आल्या आल्या दोन्ही लहान पोरं विचारत होते, रिपोर्ट काय आहे ? मी सरळ सांगून दिलं की तो पॉझिटिव्ह आलाय. नंतर जोरजोरात दोघांची रडापड सुरू झाली. दोघांनाही समजून सांगताना नाकीनऊ येत होते. आपले अश्रू लपवताना त्यांचे अश्रू थांबवणे कठीण जात होते. बाबा आता काय होणार ? असा प्रश्न दोघेही वारंवार विचारत होते. त्याच्या बहिणीला समजून सांगताना जड जात होतं की बेटा तो आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राहणार. मग तिने प्रश्न केला बाबा मीही त्याच्यासोबत राहते चालेल का ? तो एवढा लहान आहे एकटा कसा राहील ? मी मात्र निरुत्तर आणि स्तब्ध होतो. एकाला वाचवायला दुसºयाला अर्पण करायला निघालो होतो. परिस्थितीच तशी भीषण होती. तिने (त्याच्या बहिणीने) मोठ्या मनाने त्याची आणि तिची बॅग भरली. टूथ ब्रश, साबण जेवणाचं ताट, कपडे बॅगेत भरत होती. माझं मन आणि शरीर गळून गेलं होतं. पण ती स्थिर झाली नि तिने मला व त्याला समजावलं. पाहता-पाहता सायंकाळचे सहा वाजले. संपूर्ण परिसराला समजले होते की, आम्ही पॉझिटिव्ह आलो आहे. काही वेळाने १०८ रुग्णवाहिका घराजवळ आली. त्यात तो आणि त्याचे दोन मित्र त्यांचे आई-वडील बसले होते. रुग्णवाहिका सर्वोपचार रुग्णालयातकडे निघून गेली. बेटा तूझा आज वाढदिवस, पण... पुढे ते पोस्टमध्ये लिहितात की, जन्मल्यापासून आतापर्यंत ज्या माय बापाचं त्यानं बोट कधी सोडलं नाही. त्यांनाच आता सोडून राहायचं म्हणजेच खूप मोठी परीक्षा होती. या भीषण परिस्थितीतून बाहेर येण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो. हीच प्रार्थना. आज तिचा जन्मदिवस आहे. बेटा दरवर्षी तुझा वाढदिवस खूप चांगला साजरा करतो. पण या वेळेस तुलाच परिस्थिती सहन करून हाताळायची आहे. माझ्या संपूर्ण जन्माचं पुण्य तूला लागो. तू आणि तो सुखरूप घरी परत येवो. हीच प्रार्थना. तुझ्या सारखीच मुलगी सर्वांना देवो हे मागतो.