CoronaVirus : कोरोनातून बरे झाल्यानंतरही ‘फायब्रोसीस’चा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 10:32 AM2020-10-09T10:32:07+5:302020-10-09T10:32:18+5:30
Akola News, CoronaVirus, Fibrosis १० ते २० टक्के रुग्णांना या आजाराला नव्याने सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: लक्षणे नसली, तरी कोरोनाबाधित रुग्णांमध्ये प्रामुख्याने फुफ्फुसाचे इन्फेक्शन आढळून येते. यांसह इतरही आजारांची लक्षणं दिसून येतात. यावर मात करून अनेक रुग्ण बरे झालेले आहेत; मात्र त्यानंतरही त्यांच्यामध्ये ‘फायब्रोसीस’ म्हणजेच फुफ्फुसाचे इन्फेक्शन पुन्हा आढळून येण्याची शक्यता आहे. म्हणूनच कोरोनातून बरे झालेल्या गंभीर रुग्णांपैकी १० ते २० टक्के रुग्णांना या आजाराला नव्याने सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास येत आहे.
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाला न्यूमोनिया झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये फायब्रोसीसचा त्रास सुरू झाल्याचे आढळून येत आहे. या रुग्णांच्या रक्तामध्ये आॅक्सिजनचे प्रमाण कमी असल्याचेही आढळून आल्याचे तज्ज्ञ सांगतात. फुफ्फुसामध्ये आॅक्सिजन आणि कार्बनडाय आॅक्साईड यांच्या आवागमनाची प्रक्रिया सुरू असते. त्यामध्ये त्रास व्हायला लागतो.
या रुग्णांना श्वास घेताना त्रास होणे, धाप लागणे, खोकला येणे, थकवा जाणवणे यांसह श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. कोरोना काळात न्यूमोनिया असलेल्या रुग्णांमध्ये फुफ्फुसाच्या उतींना क्षति पोहोचते. त्या ठिकाणी जाड व कठीण उतींमुळे फुफ्फुसांचे कार्य मंदावते. या काळात कोरडा खोकला, थकवा, अचानक वजन कमी होणे, नैराश्य यांसह काही लक्षणे व्यक्तीनुसार बदलत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
काय करावे
- पुन्हा कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- ताप येणे, हगवण लागणे, कोरडा खोकला, तोंडाची चव जाणे या लक्षणांकडे विशेष लक्ष द्यावे.
- पहिल्या पाच दिवसात ही लक्षणे आढळतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
दीड महिन्यानंतर पुन्हा कोरोना होण्याची शक्यता
कोरोना होऊन गेल्यामुळे रुग्णांमध्ये अॅन्टीबॉडिज तयार होतात. त्यामुळे कोरोनातून बरा झालेल्या रुग्णाला साधारणत: सहा आठवडे म्हणजेच दीड महिना पुन्हा कोरोना होण्याची शक्यता नसते; पण त्यानंतर पुन्हा इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. जे गंभीर रुग्ण आहेत, अशांमध्ये हृदय, किडनी व लिव्हरच्या आजारांची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना होऊन गेल्यावर साधारणत: दीड महिना पुन्हा कोरोना होण्याची शक्यता नसते. त्यानंतर कोरोनाची लक्षणे दिसताच पहिल्या पाच दिवसांमध्ये उपचार घेण्यास सुरुवात करावी. याकडे दुर्लक्ष केल्यास निमोनिया होण्याची शक्यता जास्त आहे.
- डॉ. सागर थोटे, फुफ्फुसविकार तज्ज्ञ,अकोला.