CoronaVirus : दुसऱ्या लाटेत ‘सुपर स्प्रेडर’ व्यक्तींवर राहणार विशेष लक्ष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 10:53 AM2020-11-17T10:53:34+5:302020-11-17T10:53:43+5:30
Akola coronavirus News ‘सुपर स्प्रेडर’ व्यक्तींचे सर्वेक्षण करून त्यांची वैद्यकीय चाचणीवर अधिक भर राहणार आहे.
अकोला: जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात राज्यात कोरोनची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावेळी कोरोना फैलावाचा वेग कमी व्हावा, या अनुषंगाने ज्या व्यक्तींचा जनसंपर्क जास्त आहे, अशा ‘सुपर स्प्रेडर’ व्यक्तींचे सर्वेक्षण करून त्यांची वैद्यकीय चाचणीवर अधिक भर राहणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती सतावत असली, तरी योग्य नियोजन आणि सतर्कता बाळगल्यास कोरोना विषाणूच्या फैलावावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. त्या अनुषंगाने प्रशासन तयारीला लागले असून, आरोग्य विभागाला योग्य नियोजनाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने अधिक जनसंपर्क असणाऱ्या ‘सुपर स्प्रेडर’ व्यक्तींचे सर्वेक्षण करून, त्यांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, अशा विविध गटांमधील व्यक्तींचे समूह स्वरूपात सर्वेक्षण तसेच प्रयोगशाळा तपासणी केली जाणार आहे. दैनंदिन प्रयोगशाळा तपासणीमध्ये किमान ५० टक्के नमुने हे या गटातील व्यक्तींचे असणार आहे.
ही आहेत ‘सुपर स्प्रेडर’
छोटे व्यावसायिक गट - किराणा दुकानदार, भाजीवाले तसेच पदपथावर विविध वस्तूंची विक्री करणारे इतर विक्रेते, हॉटेल मालक आणि वेटर्स
घरगुती सेवा पुरविणारे - दूधवाला, घरगुती काम करणाऱ्या मोलकरणी आणि इतर नोकर, गॅस सिलिंडर वितरण करणारे कर्मचारी, इलेक्ट्रिक विषयक कामे, नळजोडणी, दुरुस्ती अशी घरगुती कामे करणाऱ्या व्यक्ती, लॉन्ड्री, पुरोहित
वाहतूक व्यवसायातील लोक - मालवाहतूक करणारे ट्रक ड्रायव्हर्स, टेम्पो चालक, रिक्षाचालक
वेगवेगळी कामे करणारे मजूर - हमाली, रंगकाम, बांधकाम करणारे मजूर
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ड्रायव्हर, कंडक्टर आणि इतर कर्मचारी
हाऊसिंग सोसायटीमध्ये काम करणारे सेक्युरिटी गार्ड, सुरक्षा रक्षक,
तसेच आवश्यक सेेवा पुरविणारे शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसेच पोलीस आणि होमगार्ड्स इत्यादी.
फैलाव रोखण्याची जबाबदारी सर्वसामान्यांची
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याच सोबत सर्वसामान्यांचीही जबाबदारी असून, विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने नियमित मास्कचा वापर करून इतरांपासून सुरक्षीत अंतर ठेवणे तसेच नियमित साबणाने हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर तयारी केली जात आहे. याच सोबत प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य असून, प्रत्येकाने मास्कचा वापर करुन, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे व वारंवार हात स्वच्छ धुवावेत.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला