CoronaVirus :‘कंटेनमेन्ट झोन’मधील गर्भवतींना हवा स्वतंत्र कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 10:28 AM2020-05-18T10:28:30+5:302020-05-18T10:28:40+5:30
‘कंटेनमेंट झोन’मधील गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.
- सचिन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण असलेल्या ‘कंटेनमेंट झोन’मधील बैदपुरा परिसरातील दोन गर्भवती महिलांना यापूर्वी जिल्हा स्त्री रुग्णालयात नेल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. त्यानंतर शनिवारी पुन्हा दोन महिलांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर येताच स्त्री रुग्णालयात दाखल असलेल्या गर्भवती महिलांच्या नातेवाइकांनी आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाला साकडे घालत ‘कंटेनमेंट झोन’मधील गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.
कोरोना या तीव्र संसर्गजन्य विषाणूंचा धोका गर्भवती महिला तसेच शिशूंना असल्याची माहिती आहे. त्यामुळे सार्वजनिक रुग्णालय असलेल्या स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलांना एकाच ठिकाणी ठेवण्यात येत असल्याने त्यांना कोरोना होण्याचा धोका आहे. अशातच जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५० च्या घरात गेली असून, जिल्ह्यात तब्बल ३२ ‘कंटेनमेंट झोन’ आहेत. त्यामुळे या कंटेनमेंट झोनमधून येणाऱ्या गर्भवती महिलांना व त्यांच्या शिशूंसाठी एक स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील इतर भागातून आलेल्या गर्भवती महिलांच्या मनात संशयाला वाव निर्माण होणार नाही, याच कारणामुळे कंटेनमेंट झोनमधील गर्भवती महिला आल्यानंतर त्यांची तपासणी व प्रसूती एका स्वतंत्र कक्षात करण्याची मागणी करण्यात येत आहे. अशा प्रकारचे पत्र आरोग्य विभाग तसेच पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती आहे.
सुमारे ५०० गर्भवती व शिशूंना धोका
जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी सुमारे ५०० गर्भवतींची ये-जा आहे. यासोबतच याच प्रमाणात तब्बल ३०० ते ४०० शिशूही याच स्त्री रुग्णालयात उपचार घेतात. त्यामुळे कंटेनमेंट झोनमधील गर्भवतींना स्त्री रुग्णालयात इतर गर्भवतींसोबतच ठेवण्यात येत असल्याने त्या गर्भवती महिलांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेड झोन, कंटेनमेंट झोनमध्ये रहिवासी असलेल्या महिलांसाठी एक स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करून त्यांना त्याच ठिकाणी ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.
रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण करा!
स्त्री रुग्णालयातील प्रत्येक कक्ष तसेच बेडचे निर्जंतुकीकरण करण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाइकांकडून करण्यात आली आहे. यासोबतच परिचारिकांनाही योग्य ती सुरक्षेची साधने देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. रुग्णालयाचे वारंवार निर्जंतुकीकरण केल्यास गर्भवती व शिशूंना धोका होणार नसल्याचेही गर्भवती महिलेचे नातेवाईक असलेले किशोर दामोदर यांचे म्हणणे आहे.
३२ ‘कंटेनमेंट झोन’मध्ये हजारो महिला
जिल्ह्यात सद्यस्थितीत ३२ कंटेनमेंट झोन असून, या ठिकाणावर हजारो महिला रहिवासी आहेत. त्यामधील शेकडो महिला गर्भवती असून, त्यांना वेगवेगळ्या कालावधीत सोनोग्राफी तसेच विविध तपासणीसाठी आणि प्रसूतीसाठी स्त्री रुग्णालयात आणण्यात येते. त्यांची ये-जा तसेच कंटेनमेंट झोनमधील धोका लक्षात घेता या शेकडो महिला इतर गर्भवती महिलांसाठी धोकादायक ठरू शकतात.