CoronaVirus : आता अकोल्यातही होणार ‘सेरो’ सर्वेक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 10:19 AM2020-08-28T10:19:01+5:302020-08-28T10:19:13+5:30
या चाचण्यांमधून संबंधित व्यक्तिंच्या शरिरात तयार झालेल्या प्रतिजैविक पेशींबाबत माहिती मिळणार आहे.
अकोला: नकळत किती लोकांना कोरोनाची लागण झाली, याची माहिती घेण्यासाठी आता अकोल्यातही अॅन्टीबॉडीज चाचणी म्हणजेच ‘सेरो सर्वेक्षण’ केले जाणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन तयारीला लागले असून, या संदर्भात गुरुवारी विभागीय आयुक्त पीयुष सिंह व जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात आरोग्य यंत्रणेची आॅनलाइन बैठक झाली.
जिल्ह्यात आतापर्यंत प्रत्यक्ष झालेल्या कोविड चाचण्यांव्यतिरिक्त कोविडचा संसर्ग किती लोकांपर्यंत पोहोचला? किती जणांना कोविडची बाधा होऊन गेली? त्यांच्या शरिरात प्रतिकारशक्ती तयार झाली का? त्यातून समूहाची प्रतिकारशक्ती तयार झाली की नाही? यासंदर्भात ‘सेरो लॉजिकल’ या सर्वेक्षणातून माहिती मिळणार आहे. भारतीय वैद्यकीय अनुसंधानतर्फे देशभरातील ८० जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण सुरू आहे.
जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत हे सर्वेक्षण राबविण्याची भूमिका घेतली आहे. या चाचण्यांमधून संबंधित व्यक्तिंच्या शरिरात तयार झालेल्या प्रतिजैविक पेशींबाबत माहिती मिळणार आहे.
या विषयावर गुरुवारी झालेल्या आॅनलाइन बैठकीत विभागीय आयुक्त पीयुष सिंह हे अमरावती येथून, तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. उमेश जवळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी सहभागी झाले होते.
यावेळी या सर्वेक्षणाचे राज्य नोडल अधिकारी डॉ. संजय झोडपे यांनी नागपूर येथून सहभागी होऊन मार्गदर्शन केले.
‘सेरोलॉजिकल’ सर्वेक्षण हे एक लाख लोकसंख्येमागे १०० व्यक्तिंचे केले जाणार आहे.
या शंभर व्यक्तिंच्या रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहे.
ज्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली नाही, अशा व्यक्तिंच्याच रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहे.
हे नमुने वेगवेगळ््या समूहातून घेण्यात येणार आहेत.
त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्रातील, शहरी-ग्रामीण, अति अजोखमीचे व्यक्ती तसेच विविध वयोगटातील व्यक्तिंचे नमुने घेण्यात येतील.
चाचण्यांसंदर्भात नियोजनाचे निर्देश
सध्या प्रशासन यासंदर्भात चाचण्या कशा पद्धतीने राबवायच्या, याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समूह औषध निर्माण व सूक्ष्मजीवशास्त्र या विभागांमार्फत नियोजन करावे, त्यासाठी आरोग्य विभागाच्या यंत्रणांचा सहयोग घ्यावा,असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.