CoronaVirus : ‘कोरोना’बाधितांची आता एकच चाचणी; दहाव्या दिवशी सुटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 10:11 AM2020-05-15T10:11:43+5:302020-05-15T10:12:21+5:30
पहिल्या चाचणीनंतर तो ‘पॉझिटिव्ह’ आल्यास त्यावर दहा दिवस उपचार केले जाणार आहेत.
अकोला : कोरोनाबाधित रुग्णाच्या सलग तीन चाचण्या ‘निगेटिव्ह’ आल्यानंतरच त्याला सुटी दिली जात होती; मात्र ‘आयसीएमआर’च्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार रुग्णाची कुठलीही चाचणी न करता थेट दहाव्या दिवशी त्याला रुग्णालयातून सुटी दिली जाणार आहे. सुटी देण्यात आलेल्या रुग्णाला आता १४ ऐवजी सात दिवसांसाठी ‘होम क्वारंटीन’ राहावे लागणार आहे.
कोरोनाविषयी केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार, कोरोनाच्या संदिग्ध रुग्णाच्या पहिल्या चाचणीनंतर तो ‘पॉझिटिव्ह’ आल्यास त्यावर दहा दिवस उपचार केले जाणार आहेत. यानंतर त्याची पुन्हा चाचणी केली जाणार नाही. दरम्यान, मध्यम लक्षणे असलेले रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यावर त्यांना दहाव्या दिवशीच चाचणीशिवाय सुटी दिली जाणार आहे; परंतु सुटी देत असताना रुग्णाला सलग तीन दिवस ताप नसावा किंवा आॅक्सिजनची गरज भासू नये, अशी अटही ठेवण्यात आली आहे. रुग्णाला सुटी दिल्यानंतर आता १४ दिवसांऐवजी केवळ सात दिवसांसाठीच त्यांना ‘होम क्वारंटीन’ राहावे लागणार आहे.
अशा आहेत मार्गदर्शक सूचना सौम्य लक्षणे असणाºया रुग्णांसाठी
‘आयसोलेशन’ कक्षात दाखल करण्यात आलेल्या सौम्य किंवा प्रारंभिक लक्षणे असलेल्या रुग्णांचे नियमित तापमान तपासले जाणार आहे.
पल्स मॉनिटरिंगही केले जाईल.
त्यांना सलग तीन दिवस ताप नसेल आणि उपचाराचे दहा दिवस पूर्ण झाले असेल, तर रुग्णांना सुटी देण्यात येईल.
सुटीनंतर १४ ऐवजी सात दिवस ‘होम क्वारंटीन’ राहावे लागणार.
कोरोनाबाधिताला सुटी देण्यापूर्वी
कोरोनाबाधित रुग्णाला ‘कोविड केअर फॅसिलिटी सेंटर’मधून सुटी देण्यापूर्वी रुग्णाचे ‘आॅक्सिजन सॅच्युरेशन’ ९५ टक्यांपेक्षा खाली आले, तर त्याला ‘डेडिकेटेड कोविड केअर’मध्ये दाखल करण्यात येईल. डिस्चार्ज दिल्यानंतर रुग्णाला पुन्हा ताप, कफ किंवा श्वास घेण्यास समस्या निर्माण झाल्यास त्यांना ‘कोविड केअर फॅसिलिटी’, राज्याचा मदत क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे.
...तर त्या रुग्णांवर आणखी तीन दिवस उपचार
ज्यांना आॅक्सिजन दिला आहे आणि तीन दिवसांनंतरही ताप आहे, अशा रुग्णांना कोरोनाचे कोणतेही लक्षण नसेल, तरच सुटी दिली जाणार आहे. तसेच सलग तीन दिवस आॅक्सिजन सॅच्युरेशन कायम राहिल्यानंतरच त्यांना सुटी दिली जाईल.
अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यावरच गंभीर रुग्णांना सुटी
गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे पूर्णत: गेल्याशिवाय त्यांना रुग्णालयातून सुटी दिली जाणार नाही. तसेच लक्षणे पूर्णत: नाहीशी झाल्यानंतरच त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यावरच त्यांना सुटी दिली जाणार आहे.
‘आयसीएमआर’च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णांना दहाव्या दिवशी सुटी दिली जाईल; परंतु गंभीर रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याशिवाय त्याला सुटी दिली जाणार नाही. रुग्णांना सुटी दिल्यानंतरही सात दिवसांसाठी ‘होम क्वारंटीन’ राहावे लागणार आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.