CoronaVirus : सिंधी कॅम्पमध्ये सर्वेक्षण; मनपाचे शिक्षक, आशा वर्कर सरसावले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 10:17 AM2020-04-28T10:17:13+5:302020-04-28T10:17:24+5:30
कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील दक्षिण झोन अंतर्गत येणाऱ्या सिंधी कॅम्प परिसरात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. या भागातील सर्वेक्षणाला सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला.
सर्वेक्षणासाठी मनपाच्या मालमत्ता कर वसुली विभागातील साहाय्यक कर अधीक्षक, करवसुली लिपिक, शिक्षक तसेच आशा वर्कर कामाला लागले आहेत. कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण मनपा क्षेत्रात ७ एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर ही संख्या वाढून ८ झाली होती. यापैकी प्रभाग क्रमांक ११ मधील ताजनापेठ भागातील एका ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. यादरम्यान मध्यंतरी कोरोनाचा कोणताही पॉझिटिव्ह रुग्ण न आढळून आल्याने महापालिका तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला होता. दरम्यान २६ एप्रिल रोजी दक्षिण झोन अंतर्गत येणाºया सिंधी कॅम्प परिसरातील पक्की खोली भागात राहणाºया एका ४१ वर्षीय किराणा व्यावसायिकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. संबंधित इसमाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल समोर येताच मनपा प्रशासनाने २६ एप्रिल रोजी पोलीस प्रशासनाच्या मदतीने सिंधी कॅम्प परिसराला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून हा भाग सील केला. तसेच या भागात सर्वेक्षण करण्यासाठी २० पथकांचे गठन केले.
६० जणांची चमू लागली कामाला
सिंधी कॅम्प भागातील पक्की खोली परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने या संपूर्ण प्रतिबंधित क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी ६० जणांची चमू कामाला लावली आहे. यामध्ये मालमत्ता कर वसुली विभागातील वसुली लिपिक, शिक्षक तसेच आशा वर्कर यांचा समावेश आहे. मंगळवारपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करा! प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या सिंधी कॅम्प परिसराचे सर्वेक्षण करण्यासाठी मनपा आयुक्तांनी गठित केलेल्या पथकांना मंगळवारपर्यंतची मुदत दिली आहे. या दरम्यान नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या कुटुंबात किती सदस्य आहेत, कोणी बाहेरगावी आहे का, घरातील व्यक्तीस किरकोळ आजार आहे का, या सर्व बाबींची नोंद घेतल्या जाणार आहे.
परिसरात केली फवारणी
सिंधी कॅम्प भागातील पक्की खोली परिसरात आढळून आलेल्या कोरोनाबाधित इसमाच्या घरी तसेच घरालगतच्या रहिवाशांच्या घरी महापालिकेच्या मलेरिया विभागाच्यावतीने निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तसेच परिसरातही फवारणी करण्यात आली.
कोरोनाबाधित रुग्णाचे घर व घरालगतच्या संपूर्ण परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आला. तसे स्पष्ट निर्देश मलेरिया विभागाला दिले होते. वैद्यकीय आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा कोणतीही हयगय खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.
- संजय कापडणीस,
आयुक्त, मनपा