CoronaVirus : शिक्षक, आशा वर्कर यांना संसर्गाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 10:17 AM2020-05-13T10:17:40+5:302020-05-13T10:17:53+5:30
आरोग्य तपासणी करणाऱ्या महापालिकेचे शिक्षक व आशा वर्कर यांना संसर्गाची लागण होण्याची शक्यता बळावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणूचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील रहिवाशांना कोरोना विषाणूचे कवडीचेही गांभीर्य नसल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकारामुळे प्रभाग ११ मध्ये मागील दीड महिन्यापासून सर्वेक्षण व नागरिकांची दैनंदिन आरोग्य तपासणी करणाऱ्या महापालिकेचे शिक्षक व आशा वर्कर यांना संसर्गाची लागण होण्याची शक्यता बळावली आहे. या भागातील नागरिकांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी मनपा व पोलीस प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी समोर आली आहे.
महापालिका क्षेत्रात प्रभाग क्रमांक ११ मधील परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला. या क्षेत्रामध्ये शहरातील मुख्य बाजारपेठ वसली आहे हे विशेष. दरम्यान, कोरोना बाधित रुग्णाच्या परिसरात सर्वेक्षणासाठी तसेच नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी मनपा प्रशासनाने मालमत्ता करवसुली विभागातील वसुली लिपिक तसेच शिक्षक व आशा वर्कर यांची नियुक्ती केली. शिक्षक व आशा वर्कर यांच्यावतीने प्रभाग क्रमांक ११ मधील विविध गल्लीबोळातील नागरिकांची घरे पिंजून काढण्यात आली असून, त्यांची दैनंदिन आरोग्य तपासणी केली जात असतानाही या प्रभागातून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे तपासणी पथकांच्या निदर्शनास आले आहे. अर्थात रुग्णांची संख्या वाढण्यामागे या भागातील नागरिकांची मनमानी कारणीभूत असल्याचे चित्र समोर आले आहे. नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी जाणाºया पथकांना संबंधित नागरिक योग्य माहिती देत नसल्याचे निरीक्षण पथकांनी नोंदवले आहे. हा प्रकार पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणे मुश्कील होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.