CoronaVirus : फिलिपिन्समध्ये अडकले अकोल्यातील दहा विद्यार्थी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:12 AM2020-03-18T11:12:50+5:302020-03-18T11:12:57+5:30

मनिला या शहरात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या या विद्यार्थ्यांना भारत परतही येता येत नाही व यापैकी काही विद्यार्थ्यांचा ‘व्हिसा’ संपला आहे.

CoronaVirus: Ten students from Akola stuck in the Philippines! | CoronaVirus : फिलिपिन्समध्ये अडकले अकोल्यातील दहा विद्यार्थी!

CoronaVirus : फिलिपिन्समध्ये अडकले अकोल्यातील दहा विद्यार्थी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे जगातील अनेक देशांमधून भारतात येणारी विमाने रद्द करण्यात आली आहेत. त्याचा फटका अकोल्यातील दहा विद्यार्थ्यांनाही बसला आहे. फिलिपीन्समधील मेट्रो मनिला या शहरात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या या विद्यार्थ्यांना भारत परतही येता येत नाही व यापैकी काही विद्यार्थ्यांचा ‘व्हिसा’ संपला आहे. कोरोनामुळे बंद ठेवण्यात आलेल्या प्रशासकीय यंत्रणेमुळे व्हिसाचे नूतनीकरणही होणे अशक्य असल्याने हे विद्यार्थी दुहेरी संकटात सापडले आहेत.
फिलिपीन्समधील मेट्रो मनिला या शहरातील आमा मेडिकल कॉलेजमध्ये अकोल्यातील दहा, बुलडाण्यातील दोन यांचा समावेश असलेले एकूण १७ विद्यार्थी महाराष्टÑातील आहेत. फिलिपीन्समध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात रुग्णांची संख्या नियंत्रित होती; मात्र नंतर कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. अकोल्यातील विद्यार्थी असलेल्या मेट्रो मनिला शहरातच १८७ रुग्ण असल्याने संपूर्ण शहर बंद करण्यात आले आहे, अशी माहिती या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या विद्यार्थ्यांनी भारतात परतण्याची तयारी सुरू केली होती; मात्र भारत सरकारने १७ मार्च रोजीच अफगाणिस्तान, फिलिपाइन्स, मलेशिया या देशांतून येणारी हवाई वाहतूक थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
कोरोना व्हायरसमुळे फिलिपीन्समध्ये शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास बंदी करण्यात आली आहे. फुड मॉलसह खाद्यपदार्थांची दुकाने व हॉटेल गर्दी टाळण्यासाठी बंद करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांसाठी खानावळी सुरू ठेवण्यात आल्या असल्या तरी मनिलामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांना बाहेर पडणेही कठीण झाले आहे.


‘व्हिसा’चे नूतनीकरण अडकले!
फिलिपिन्समध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेकांचा ‘व्हिसा’ संपला आहे. त्यांना व्हिसा नूतनीकरणासाठी तेथील सरकारने नोटीस दिली आहे; ही बाब ‘लोकमत’कडे अनेक विद्यार्थ्यांनी दूरध्वनीद्वारे मांडली. विद्यार्थ्यांची ही स्थिती ‘लोकमत’ने ना. संजय धोत्रे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तत्परतेने दखल घेतली.


फिलिपिन्समध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत भारतीय दूतावासाशी संवाद सुरू आहे. परराष्टÑ मंत्रालय तसेच दूतावास याबाबत फॅलोअप घेत आहे मी त्यांच्या संपर्कात आहे.
- ना. संजय धोत्रे, केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री

Web Title: CoronaVirus: Ten students from Akola stuck in the Philippines!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.