CoronaVirus : ‘त्यांनी’ सांभाळली कोरोना रुग्णांच्या कक्षाच्या स्वच्छतेची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:10 AM2020-04-24T10:10:08+5:302020-04-24T10:10:35+5:30
डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय यांच्या खांद्याला खांदा लावून हे ९ सफाई कामगार सीमेवरच्या सैनिकाप्रमाणे अविरत सेवा देत आहेत.
- संजय खांडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कोरोना संसर्गित रुग्णांजवळ कुटुंबातील सदस्यदेखील जात नाही. त्या कक्षामध्ये रुग्णांची दररोज बेडशीट बदलणे, रुग्ण वापरातील शौचालय आणि स्नानगृहाची वारंवार स्वच्छता राखणे, कोरोना वॉर्ड परिसराचे नियमित निर्जंतुकीकरण करण्याची महत्त्वाची जबाबदारी सफाई कामगार सक्षमतेने पार पाडित आहेत. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ९ सफाई कामगारांच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकलेली असून, हे कोरोना योद्धा आपली जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत.
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढताच अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सफाई कामगारांची विशेष टीम तयार करीत त्यांना प्रशिक्षित करण्यात आले. जीएमसीचे सफाई कामगार सुपरवायजर नरेंद्र गोडाले यांच्या नेतृत्वात मनोज पवार, पिंटू पचेरवाल, सतीश गोडाले, तिलक गोहर, विजय सेवता, सागर थामेद, गोकुल निधाने, मनोज नकवाल असे नऊ योद्धे या टीममध्ये अहोरात्र सेवारत आहेत. या योद्ध्यांना आज पंधरा दिवस झालेत त्यांनी घराचे आणि कुटुंबीयांचे अद्याप तोंडदेखील पाहिलेले नाही. जीएमसीजवळच असलेल्या एका खासगी निवासस्थानात या नऊ योद्ध्यांंची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येकजण शिफ्टप्रमाणे ड्युटीवर येतो. रुग्णांची गर्दी अचानक वाढली तर अतिदक्षता सेवा म्हणून या सर्वांना तातडीने एकाच वेळी हास्पिटलमध्ये पाचारण करण्यात येते अन् ते हजर होऊन सेवा देतात. डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय यांच्या खांद्याला खांदा लावून हे ९ सफाई कामगार सीमेवरच्या सैनिकाप्रमाणे अविरत सेवा देत आहेत.
मुले रुग्णालयात अन् सफाई कामगार ड्युटीवर
मनोज पवार, पिंटू पचेरवाल या दोघांची मुले चार दिवसांआधी आजारी पडली. बालरोग तज्ज्ञांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दोघांचे कुटुंबीय त्यांची काळजी घेत आहे. त्या मुलांचे वडील म्हणजे मनोज आणि पिंटू दोघेही कोरोना रुग्णाच्या वॉर्डात सेवा देत आहेत, अशी माहितीदेखील या सदस्यांनी दिली.
कोरोना वाडॉची साफसफाई करीत असताना स्वत:ची घ्यावयाची काळजी आणि रुग्णांपासून ठेवले जाणारे सुरक्षित अंतर याचा अंतर्भाव तज्ज्ञांनी आधीच प्रशिक्षणातून दिले असले तरी आमची नियमित आरोग्य तपासणी होते. सोबतच ज्या निवासस्थानी आम्ही सध्या राहत आहोत, तेथेदेखील एकमेकांमध्ये सामाजिक अंतर ठेवूनच असतो. सध्या आम्ही जीएमसीच्या नोकरीपेक्षा मिशन म्हणून या सेवेकडे पाहत आहोत.
- नरेंद्र गोडाले, सुपरवायजर, सफाई कामगार, जीएमसी अकोला.