CoronaVirus : दिवसभरात तिघांचा मृत्यू; ३२ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ५६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 06:59 PM2020-06-16T18:59:48+5:302020-06-16T19:31:51+5:30
मंगळवार, १६ जून रोजी या संसर्गजन्य आजारामुळे आणखी तिघांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली.
अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, मंगळवार, १६ जून रोजी या संसर्गजन्य आजारामुळे आणखी तिघांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली. तर आणखी ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे कोरोनाच्या बळींचा आकडा ५६ वर गेला आहे. तर एकूण बाधितांची संख्या १०७३ झाली आहे. दरम्यान, आणखी १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३४१ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. कोरोनाच्या बळींचा आकडाही वाढतच आहे. सोमवारी रात्री अकोट फैल भागातील एका ५० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.सदर महिलेला १३ जून रोजी दाखल करण्यात आले होते. मंगळवारी आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाळापूर येथील ७४ वर्षीय व्यक्तीला १३ जून रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला.बार्शीटाकळी येथील ६२ वर्षीय पुरुषाचा मंगळवारी मृत्यू झाला. सदर व्यक्तीला २६ मे रोजी दाखल करण्यात आले होते.
आणखी ३२ अहवाल पॉझिटिव्ह
मंगळवारी सायंकाळी ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. यामध्ये ११ महिला व २१ पुरुष आहेत. त्यातील सात जण चावरे प्लॉट येथील, पाच जण बाळापूर येथील, दोन जण गुलजारपुरा, दोन जण सिंधी कॅम्प, दोन जण वाशीम बायपास, दोन जण मोठी उमरी, दोन जण तारफैल येथील, तर उर्वरीत शंकरनगर, अकोट फैल, खदान, इंदिरानगर वाडेगाव, डाबकी रोड, आदर्श कॉलनी, महाकाली नगर, खेतान नगर, चांदुर खडकी, खामखेड वाडेगाव रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
१८ जणांना डिस्चार्ज
मंगळवारी दुपारनंतर १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील दोघांना कोविड केअर सेंटर येथे तर उर्वरित १६ जणांना घरी सोडण्यात आले. त्यात नऊ पुरुष व नऊ महिलांचा समावेश आहे. ह्या रुग्णांपैकी खदान येथील तीन, तारफैल येथील दोन, खडकी येथील दोन, तर सिंधी कॅम्प, मोहता मिल, मोठी उमरी, बाळापूर, देशमुख फैल, गोरक्षण रोड, दीपक चौक, ध्रुव अपार्टमेंट,जीएमसी होस्टेल, सिटी कोतवाली, अकोट फैल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
प्राप्त अहवाल-१३८
पॉझिटीव्ह-३२
निगेटीव्ह-१०६
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१०७३
मयत-५६(५५+१),डिस्चार्ज-६७६
दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३४१