CoronaVirus : अकोल्यात आणखी तिघांचा मृत्यू; ५४ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ७० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 12:59 PM2020-06-24T12:59:58+5:302020-06-24T13:02:23+5:30
बुधवार, २४ जून रोजी आणखी तिघांच्या मृत्यूची नोंद झाली.
अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची आणि बाधित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवार, २४ जून रोजी आणखी तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. तर ५४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे मृतकांचा आकडा ७० वर गेला आहे. तर एकूण बाधितांची संख्या १२९८ झाली आहे.
विदर्भातील कोरोनाचा हॉटस्पॉट अशी ओळख झालेल्या अकोल्यात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी २२५ संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित १७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. ५४ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १८ पुरुष रुग्ण हे जिल्हा कारागृहातून संदर्भित आहेत. उर्वरित ३६ जणांमध्ये १४ महिला आहेत. तर २२ पुरुष आहेत. त्यात एका तीन महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. यातील सात जण तारफैल, सात जण न्यू तारफैल, दगडीपुल येथील चार जण, खदान येथील दोन जण, बाळापूर येथील दोन जण, तर उर्वरित बार्शी टाकळी, कामा प्लॉट, सिंधी कॅम्प, रामदास पेठ, सिव्हील लाईन, शिवर, जीएमसी होस्टेल, कळंबेश्वर, जळगाव जामोद, लहान उमरी, कान्हेरी गवळी, सिद्धार्थ नगर, आदर्श कॉलनी, परदेशीपुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
तीन जण दगावले
दरम्यान, मंगळवारी रात्री तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात सोनटक्के प्लॉट येथील ७० वर्षीय पुरुष असून, त्यांना १२ जून रोजी दाखल करण्यात आले होते. अन्य एक डाबकी रोड येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्ण असून, ते ९ जून रोजी दाखल झाले होते. कामा प्लॉट येथील ८० वर्षीय महिला रुग्ण असून ही महिला २१ जून रोजी दाखल झाली होती. या तिघांचाही मंगळवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आणखी सहा जणांना डिस्चार्ज
बुधवारी आणखी सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील तिघांना घरी सोडण्यात आले. तर अन्य तिघांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत ८३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत ३९६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
प्राप्त अहवाल-२२५
पॉझिटीव्ह अहवाल-५४
निगेटीव्ह-१७१
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १२९८
मयत-७० (६९+१)
डिस्चार्ज- ८३२
दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३९६