CoronaVirus: अकोल्यात आणखी दोघांचा बळी; ११ नवे पॉझिटिव्ह, मृतकांचा आकडा ३२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 11:33 AM2020-05-31T11:33:54+5:302020-05-31T11:36:16+5:30
दोघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ३२ वर गेला आहे.
अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, बाधित रुग्णांची संख्या दररोज वाढतच आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असून, रविवारी आणखी दोघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ३२ वर गेला आहे. तर रविवारी आणखी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधीतांची संख्याही ५८१ झाली आहे. आतापर्यंत ४२३ जणांना आयसोलेशन कक्षातून डिस्जार्च देण्यात आल्यामुळे आता १२६ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, रुग्णसंख्या लक्षणीय गतीने वाढत आहे. त्यामुळे अकोला जिल्हा सद्या कोरोनाचा विदर्भातील हॉटस्पॉट ठरला आहे. शनिवार, ३० मे पर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ५७० होती. यामध्ये रविवारी आणखी ११ रुग्णांची भर पडून हा आकडा ५८१ वर गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी एकूण १८ अहवाल प्राप्त झाले. याकीपै ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित सात अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात पाच महिला व सहा पुरुष आहेत. त्यात हरिहरपेठ येथील दोन, खदान, जी. वी. खदान, गायत्रीनगर कौलखेड रोड, गोडबोले प्लॉट, फिरदौस कॉलनी, जुनेशहर, तारफैल, जठारपेठ, सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत. दरम्यान, शनिवार रात्री दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये एक व्यक्ती सुधीर कॉलनी सिव्हील लाईन येथील रहिवासी आहे. ३८ वर्षीय व्यक्तीला २७ मे रोजी दाखल करण्यात आले होते. मृत्यू झालेली दुसरी व्यक्ती बाळापुर येथील असून, ५४ वर्षीय या व्यक्तीला २६ मे रोजी दाखल करण्यात आले होते. या दोघांचा काल रात्री मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने रविवारी जाहीर केले.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-५८१
मयत-३२(३१+१),डिस्चार्ज-४२३
दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२६