अकोल्यात जनजीवन पूर्वपदावर; धोका कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 10:00 AM2020-06-09T10:00:17+5:302020-06-09T10:03:55+5:30
‘लॉकडाऊन’ उघडण्यासंदर्भात ‘अनलॉक’च्या तिसऱ्या टप्प्याची जिल्ह्यात सोमवारपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली.
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू असलेले ‘लॉकडाऊन’ उघडण्यासंदर्भात ‘अनलॉक’च्या तिसऱ्या टप्प्याची जिल्ह्यात सोमवारपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, जनजीवन पूर्वपदावर येत आहे; परंतु अकोला शहरासह जिल्ह्यातील कोरोना विषाणू वाढत्या संसर्गाचा धोका कायम असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.
८ जूनपासून जिल्ह्यात खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांचे कामकाज सुरू झाले असून, चारचाकी, तीनचाकी (आॅटो) इत्यादी वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. तसेच बाजारातील विविध वस्तूंची दुकानेही सम-विषय नियमानुसार सुरू झाली आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे चित्र सोमवारी होते. मुख्य बाजारपेठेसह शहरातील लहान-मोठी सर्वच दुकाने सुरू होती. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयासह शासकीय कार्यालयातील नियमानुसार उपस्थिती होती. हॉटेल, सलून, चहाची दुकाने मात्र बंदच होती. आॅटोचालकांनाही तब्बल अडीच महिन्यानंतर रोजगार मिळाला. ‘अनलॉक’मध्ये जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी, जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा धोका अद्याप कायम असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्यादेखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.
टप्पानिहाय लॉकडाऊन उघडण्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे; मात्र जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका कायम असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी कामाशिवाय शक्यतोवर घराबाहेर पडू नये. ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करून, मास्कचा वापर करणे गरजेचे आहे.
-जितेंद्र पापळकर
जिल्हाधिकारी