CoronaVirus : संपूर्ण सर्वोपचार रुग्णालयच होणार ‘क्वारंटीन’ वार्ड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 10:53 AM2020-03-25T10:53:52+5:302020-03-25T10:58:10+5:30
सर्वोपचार रुग्णालयात ४५० खाटांचे, तर ५० व्हेंटिलेटरचे नियोजन.
अकोला : सध्यातरी जिल्ह्यात ‘कोरोना’चा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही; परंतु दररोज संशयित रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, संपूर्ण सर्वोपचार रुग्णालयच ‘क्वारंटीन’मध्ये बदलण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार, सर्वोपचार रुग्णालयात ४५० खाटांचे, तर ५० व्हेंटिलेटरचे नियोजन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. असे असले तरी जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही; परंतु येणाऱ्या आठवड्यात परिस्थिती बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचा प्रसार चौथ्या पायरीत गेल्यास आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडू शकतो. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाने हालचालींना वेग दिला आहे. कोरोना चौथ्या टप्प्यात गेल्यास जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती उद््भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयातील जवळपास २०० डॉक्टर्स, परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी पुरविणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
असे आहे खाटांचे नियोजन
विभाग - खाटांची संख्या
त्वचा व गुप्तरोग विभाग - २०
मनोविकृती विभाग - २०
नेत्रचिकित्साशास्त्र - २०
नवीन मेडिसिन विभाग - १००
जुना मेडिसिन विभाग - १४०
बालरोग विभाग - ६०
स्त्रीरोग विभाग - ६०
-------------------------
एकूण - ४२०
‘आयसीयू’मध्ये ५० खाटा
४२० खाटांसह अतिदक्षता कक्षात ५० खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये २० खाटा जुन्या अतिदक्षता कक्षात २० खाटा, तर नवीन अतिदक्षता कक्षात ३० खाटांचा समावेश आहे.
स्त्रीरोग व बालरोग विभाग जिल्हा स्त्री रुग्णालयात
सर्वोपचार रुग्णालयाला ‘क्वारंटीन’ केल्यावर आवश्यकतेनुसार, येथील बालरोग विभाग, प्रसूती व स्त्रीरोग विभाग जिल्हा स्त्री रुग्णालयात स्थलांतरित करण्याचेदेखील नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे.