CorornaVirus : मनपाची आरोग्य यंत्रणा आता नागरिकांच्या दारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 10:18 AM2020-05-16T10:18:01+5:302020-05-16T10:18:22+5:30
नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्रपणे चार वैद्यकीय पथकांचे गठण केले आहे.
अकोला: महापालिका क्षेत्रात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी ‘कंटेनमेंट झोन’मधील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्रपणे चार वैद्यकीय पथकांचे गठण केले आहे. उद्यापासून ही पथके नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करतील.
शहराच्या बैदपुरा परिसरामध्ये कोरोनाची लागण झालेला पहिला रुग्ण ७ एप्रिल रोजी आढळून आला होता. या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे उशिरा आढळून येईपर्यंत या भागात कोरोनाचा चांगलाच फैलाव झाल्याचे उघडकीस आले. दरम्यान, मनपा प्रशासनाने पहिला रुग्ण आढळून येताच हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला.यावेळी संशयित रुग्ण व त्याच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेत असताना विविध अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे या कालावधीत बैदपुरा, मोमीनपुरा, ताजनापेठ, फतेह अली चौक, कलाल की चाळ, माळीपुरा, गवळीपुरा, सराफा बाजार, मोहम्मद अली रोड या भागांमध्ये कोरोना विषाणूने हात-पाय पसरल्याचे समोर आले. संशयित रुग्णांचे नमुने तातडीने न घेतल्यास कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी किसनीबाई भरतीया रुग्णालयात संशयित रुग्णांचे नमुने घेण्याला प्रारंभ करताच कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे अहवालाअंती समोर आले. यादरम्यान, पालकमंत्री बच्चू कडू यांनी ‘कंटेनमेंट झोन’मधील परिस्थितीचा आढावा घेतला असता कोरोनाचे उगमस्थान असलेल्या भागांमध्ये आरोग्य तपासणी वाढविण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते. त्या निर्देशानुसार मनपा आयुक्त संजय कापडणीस, उपायुक्त वैभव आवारे यांनी नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी पथकांचे नियोजन केले. आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीला मनपा सहा. आयुक्त पूनम कळंबे, क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, संदीप गावंडे, विठ्ठल देवकते, विजय पारतवार, राजेंद्र टापरे, मनपाचे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारूख शेख, डॉ. प्रभाकर मुदगल व डॉ. अस्मिता पाठक यांची उपस्थिती होती.
पाच हजार कुटुंबांची तपासणी
कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या बैदपुरा, खैर मोहम्मद प्लॉट, माळीपुरा व गवळीपुरा या चार परिसरातील सुमारे पाच हजार कुटुंबांना मनपाचे वैद्यकीय अधिकारी भेट देणार आहेत. नागरिकांच्या घरी जाऊन मधुमेह, दुर्धर आजार, दमा तसेच हृदयाशी संबंधित आजारांची तपासणी करण्यात येईल.