मनपाची प्रयाेगशाळा केली; तीन दिवसांत स्वच्छता न केल्यास तीव्र आंदाेलन छेडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:24 AM2021-09-15T04:24:14+5:302021-09-15T04:24:14+5:30
मनपा प्रशासनाने पडीक वाॅर्ड बंद केल्यानंतर याठिकाणी आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. आस्थापनेवरील अनेक कर्मचारी कर्तव्यावर हजर राहत असले ...
मनपा प्रशासनाने पडीक वाॅर्ड बंद केल्यानंतर याठिकाणी आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. आस्थापनेवरील अनेक कर्मचारी कर्तव्यावर हजर राहत असले तरी प्रत्यक्षात साफसफाइची कामे करीत नसल्याचे समाेर आले आहे. यात भरीस भर आयुक्त निमा अराेरा यांनी कचरा उचलणारे ३२ ट्रॅक्टर अचानक बंद केल्याने कचऱ्याची समस्या निर्माण झाली. त्यामुळे मनपाच्या १६ ट्रॅक्टरमध्ये कचरा जमा करण्यासाठी पूर्व, पश्चिम व उत्तर झाेनमध्ये प्रत्येकी १६ यानुसार ४८ मजुरांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली.
कर्मचाऱ्यांवर कारवाई का नाही?
४८ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यानंतर आस्थापनेवरील सफाई कर्मचारी कर्तव्यावरून पळ काढतील. प्रत्यक्षात काम न करता हजेरी पुस्तिकेत स्वाक्षरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काेणतीही कारवाई केली जात नसल्याचा मुद्दा सतीश ढगे यांनी मांडला. त्यावर सभापतींनी काेणतेही निर्देश दिले नाहीत.
अन् भाजप नगरसेवक संतापले
स्वच्छतेच्या संदर्भात भाजपचे नगरसेवक अनिल मुरुमकार यांनी सभागृहात अनेकदा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असता सभापती बडाेणे यांनी प्रत्येकवेळी बगल दिल्याचे दिसून आले. ते पाहून संतापलेल्या मुरुमकार यांनी तुमच्या मनाने सभा चालवा,असे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली.
कांबळे म्हणाले, स्लम भागाची अॅलर्जी आहे का?
घराेघरी जाऊन कचरा जमा करणारे वाहन चालक प्रभाग २ मध्ये जाणिवपूर्वक येत नाहीत. त्यांना हाॅटेल,रेस्टारंटमधून कचरा जमा करण्याच्या माेबदल्यात जास्त पैसा मिळताे असे सांगत वाहन चालकांना स्लम एरियाची अॅलर्जी आहे का, असा सवाल काॅंग्रेसचे नगरसेवक पराग कांबळे यांनी केला.