काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या घराकडे मनपा फिरकतच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:17 AM2021-03-19T04:17:43+5:302021-03-19T04:17:43+5:30
शहरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. संशयित किंवा ...
शहरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. संशयित किंवा कोरोनाबाधित रुग्णाचा जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्वप्रथम मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने सतर्क होऊन रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यापासून ते संबंधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींच्या इत्थंभूत माहितीची नोंद ठेवण्याची गरज आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून कोरोनाबाधित रुग्णांची माहिती प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय यंत्रणेने मलेरिया विभागाला पूर्वसूचना देऊन फवारणीसाठी पथके रवाना करणे, बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्याची आवश्यकता असताना या विभागाची यंत्रणा ताेकडी पडत असल्यामुळे समस्यांचे निराकरण हाेत नसल्याचे दिसत आहे. शहरात काेराेनाबाधितांची संख्या वाढत चालली असल्यामुळे नागरिकांनीच सतर्कता बाळगणे गरजेचे झाले आहे.
रुग्णांची संख्या वाढली; मनपा सैरभैर
मनपा प्रशासनाने प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारूख शेख यांच्याकडे सनियंत्रण अधिकारीपदाची जबाबदारी सोपवली असून मागील १० ते १२ दिवसांपासून डाॅ. शेख आजारी रजेवर असल्याची माहिती आहे. त्यामुळे डाॅ. अस्मिता पाठक यांच्याकडे प्रभार साेपविण्यात आला आहे. या विभागाकडे शहरातील पाॅझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी उपलब्ध असली, तरी त्यामध्ये माेठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे हा विभाग सैरभैर झाला आहे.
झाेन अधिकाऱ्यांच्या जबाबदारीत वाढ
एप्रिल २०२० मध्ये शहरात काेराेनाचा सामना करण्यासाठी चारही झाेन अधिकाऱ्यांकडे महत्त्वाची धुरा साेपविण्यात आली हाेती. त्यावेळी दिवसरात्र एक करून झाेन अधिकारी, मालमत्ताकर अधीक्षक, वसुली निरीक्षक, शिक्षक व आशा वर्करच्या माध्यमातून प्रशासनाने काेराेनावर नियंत्रण मिळवले हाेते. आताही प्रादुर्भाव वाढल्याचे पाहता आयुक्त निमा अराेरा यांनी झाेन अधिकाऱ्यांच्या जबाबदारीत वाढ केली आहे. सकाळी ९ वाजतापासूनच झाेन अधिकारी कामाला लागत असल्याचे दिसत आहे.