लसीकरण केंद्रात मूलभूत सुविधा पुरविण्यात मनपा अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:18 AM2021-05-14T04:18:39+5:302021-05-14T04:18:39+5:30
अकोला : महापालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये लस घेण्यासाठी वयोवृद्ध नागरिकांच्या रांगा लागत आहेत. त्यांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागत ...
अकोला : महापालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये लस घेण्यासाठी वयोवृद्ध नागरिकांच्या रांगा लागत आहेत. त्यांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. ही गर्दी होणार हे लक्षात घेऊन नागरिकांसाठी मंडप व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात मनपा प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचा मुद्दा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्या बैठकीत उपस्थित केला. त्यावर मूलभूत सुविधांची पूर्तता करण्याचे निर्देश कडू यांनी मनपा आयुक्त निमा अरोरा यांना दिले.
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री कडू यांनी जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाद्वारे केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा गुरुवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या दालनात आढावा घेतला. आढावा बैठकीला सेनेचे आमदार नितीन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा पोलीस उपअधीक्षक मोनिका राऊत यांच्यासह जिल्हा वैद्यकीय आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी लस घेण्यासाठी वयोवृद्ध नागरिकांना भर उन्हात रांगेमध्ये तासन् तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यांना बसण्यासाठी मनपाने खुर्च्यांची व्यवस्था तसेच मंडप व पिण्याच्या पाण्याची सुविधा का उपलब्ध केली नाही, असा सवाल आ. देशमुख यांनी उपस्थित केला. त्यावर लसीकरण ही दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया असल्यामुळे लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी मूलभूत सुविधांची पूर्तता करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी आयुक्तांना या वेळी दिले.
मनपाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
मनपाच्या लसीकरण केंद्रांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे. त्या ठिकाणी काम करणारे डॉक्टर, अधिपरिचारिका मानसिक दबावात आहेत. त्यांचे मनोधैर्य उंचावण्याची जबाबदारी मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आहे. या सर्व बाबींचा अभाव दिसून येत आहे. तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्याचे काम केले होते, असे आ. देशमुख यांनी नमूद केले.
कोरोनाच्या संकटात नोटिसा का दिल्या?
शहरावर कोरोनाचे संकट घोंगावत असताना मनपा प्रशासनाला जनता भाजी बाजारातील दुकाने खाली करण्याची घाई का झाली, व्यावसायिकांना नोटिसा का दिल्या, असा सवाल आमदार देशमुख यांनी उपस्थित केला. त्यावर ही प्रक्रिया थांबविण्याची सूचना पालकमंत्री बच्चू कडू यांनी केली.