अखेर महानगरपालिकेला नालेसफाईचा मुहूर्त सापडला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 01:25 PM2020-06-16T13:25:26+5:302020-06-16T13:25:54+5:30
यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने जेसीबी व पोकलेन मशीनद्वारे नालेसफाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
अकोला : उशिरा का होईना अखेर मान्सून दाखल झाल्यानंतर शहरात मनपाच्या स्तरावर सोमवारपासून नालेसफाईला प्रारंभ करण्यात आला. यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने जेसीबी व पोकलेन मशीनद्वारे नालेसफाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका प्रशासनाच्यावतीने दरवर्षी मोठे नाले तसेच एक मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या नाल्याची मान्सूनपूर्व साफसफाई केली जाते. त्यापूर्वी नालेसफाईच्या निविदा काढल्या असता कंत्राटदारांकडून थातूरमातूर पद्धतीने कामे केली जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. नालेसफाईच्या कामावर लाखो रुपयांची देयके अदा केल्यानंतरही समस्या कायम राहत असल्याची परिस्थिती होती. या सर्व बाबी लक्षात घेता प्रशासनाने मनपाच्या स्तरावर नालेसफाई करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, यावर्षी जीवघेण्या कोरोना विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. महापालिका क्षेत्रातही कोरोनाने तब्बल १ हजारचा आकडा गाठला आहे. त्यामुळे कोरोनाला अटकाव घालण्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. असे असले तरीही पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील मोठ्या नाल्यांची साफसफाई करणे क्रमप्राप्त आहे. शहरात मान्सूनचे आगमन झाल्यावर उशिरा का असेना सोमवारपासून मनपाच्यास्तरावर नाला सफाईच्या कामांना प्रारंभ करण्यात आला.